जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी स्विस समूह आईक्यूएअरने जाहीर केली आहे. या यादीत भारतातील तीन शहरांचा समावेश आहे. यादीत अति प्रदुषित शहरांचा समावेश असून या शहरांमधील हवेची स्थिती अत्यंत वाईट पातळीवर आहे. हे प्रदुषण नागरिकांसाठी घातक आहे.
आईक्यूएअरच्या या यादीनुसार, जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्लीतील एक्यूआय (AQI) पातळी ५१९ वर पोहोचली आहे. म्हणजे दिल्लीतील प्रदुषण अत्यंत गंभीर अवस्थेत पोहचले आहे. सर्वोत्तम एक्यूआय पातळी शून्य आणि ५० च्या दरम्यान असते. दिल्लीनंतर पाकिस्तानच्या लाहोर शहराचा जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये समावेश झाला आहे. लाहोरमध्ये एक्यूआय पातळी २८३ वर आहे.
या यादीत कोलकाता तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकातामध्ये एक्यूआय १८५ ची नोंद झाली आहे. हिवाळा सुरू झाल्याने येथे धुराचे प्रमाण वाढू लागले आहे. वायू प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईची हवा धोकादायक आहे. मुंबईतील एक्यूआय १७३ च्या पातळीवर आहे. मुंबईतील हवेतील प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे.
कुवेत शहरातही हवेचे प्रदूषण वाढत आहे. येथे एक्यूआय १६५ ची नोंद झाली आहे. कुवेतमधील लोकही वायू प्रदूषणाच्या समस्येशी झगडत आहेत. वायू प्रदूषणामुळे लोक घराबाहेर पडणे टाळत आहेत. बांगलादेशातील ढाका शहरातही वायू प्रदूषणाची स्थिती गंभीर असून येथे एक्यूआय १५९ च्या पातळीवर आहे.
आईक्यूएअरच्या जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीनुसार, बगदाद, इराकमध्ये एक्यूआय १५८, जकार्ता, इंडोनेशियामध्ये एक्यूआय १५८, दोहा, कतारमध्ये एक्यूआय १५३ आणि चीनच्या वुहान शहरात एक्यूआय १५३ च्या पातळीवर आहे.