Breaking News

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपत्ती निवारणाचे नवे मार्ग शोधा

आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण परिषदेत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रात दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार सारखी योजना यशस्वी ठरली. शेतीचा शाश्वत विकास होण्याबरोबरच कमी पाऊस होवून देखील शेतीच्या उत्पादकतेत घट होण्याऐवजी भरघोस वाढच झाली. ही किमया जलयुक्त शिवार योजनेमुळे साधता आल्याचे सांगत कृत्रिम बुद्धीमत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि समाजातील सर्वच घटकांच्या सहभागामुळे आपत्तीवर मात करण्याचे नवनवीन मार्ग शोधले पाहिजे,असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पवई येथील आयआयटी संस्थेच्या दीक्षांत सभागृहात चौथ्या आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यावेळी उपस्थित होते.

आपत्ती निवारणाच्या क्षेत्रात गेल्या ३० वर्षांत आमुलाग्र बदल झाला आहे. आपत्तीबाबत पूर्व सूचनांची देवाण घेवाण होत आहे. त्याचबरोबर नागरिकांनाही माहिती देऊन सावध करू शकतो. आपत्ती कुठलीही असो तिचा परिणाम समुदायावर होत असतो. संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपत्ती निवारण हा महत्वाचा घटक आहे. २०३० पर्यंत आपत्तीचे प्रमाण कमी करण्याचे ध्येय ठेवण्यात आले असून समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्यात सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

आपत्ती निवारणाच्या क्षेत्रात काम करताना येथे आधीच काम होणे गरजेचे आहे वेळ निघून गेल्यानंतर त्याचा काय उपयोग, असा सवाल करीत महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून त्यावर नवनवीन मार्ग शोधले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र देशातील विकसित राष्ट्र असून त्यातील ५२ टक्के भाग अवर्षण प्रवण आहे. गेल्या चार वर्षापासून सातत्याने दुष्काळाचा सामना करीत आहे. मात्र या परिस्थितीतही नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार सारखी योजना सुरू केली. त्यामुळे राज्यातील शेतीचा शाश्वत विकास होण्यासाठी मदत झाली. सन २०१२ -१३ मध्ये ११० टक्के पाऊस झाला आणि शेतीचे उत्पादन १८५ लाख मेट्रीक टन झाले होते. गेल्या वर्षी सरासरीच्या ८४ टक्के पाऊस होऊन देखील शेतीची उत्पादकता कमी होण्याऐवजी १८५ लाख मेट्रीक टना पेक्षाही जास्त झाली. राज्याने या योजनेच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती झुगारल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले की, या आंतरराष्ट्रीय परिषदेत ५० हून अधिक देशांचा सहभाग आणि ३० देशातील शिष्टमंडळांनी सहभाग नोंदवला आहे. आपत्ती निवारणाच्या क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने भरीव अशी कामगिरी केली आहे. आपत्ती निवारणावरील उपाय सुचविणारी ही परिषद म्हणजे समुद्र मंथन असून त्यातून अमृतरुपी नवनवीन उपाय हाती लागतील.

मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांनी स्वागतपर भाषण केले. यावेळी आयआयटी मुंबईचे संचालक देवांग खाकर, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संचालक शालीनी भारत, राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे संचालक एम.एल.मारवा यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी आपत्ती व्यवस्थापनावरील सुमारे ४५० संशोधनात्मक पेपरचा समावेश असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. २०२० मध्ये होणारी पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्ली येथे होणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

Check Also

पाणथळ जागांसोबतच कांदळवनांच्या संरक्षणासाठी प्रभावी कारवाई मुख्यमंत्र्यांनी घेतली महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाची बैठक

राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *