Breaking News

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ४१ टक्के वाढ, मात्र संप मागे घेण्याबाबत शिष्टमंडळाकडून अवधी कामावर हजर होणाऱ्यांचे निलंबन तात्काळ रद्द- एसटी अध्यक्ष अनिल परब यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी
काल रात्री आणि आज दिवसभर एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळ आणि एसटी अध्यक्ष अनिल परब यांच्यात बैठकांचे सत्र पार पडल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ४१ टक्के वाढ करत असल्याचे जाहीर करत दर महिन्याच्या १० तारखेच्या आत पगार होईल याची हमी राज्य सरकारने घेतल्याचे सांगत एसटी कामगारांनी तात्काळ कामावर हजर व्हावे असे आवाहन करत तात्काळ कामावर हजर राहणार आहेत त्यांचे निलंबन रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा एसटी अध्यक्ष तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली. मात्र या पत्रकार परिषदेला हजर असलेल्या शिष्टमंडळाच्यावतीने गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेण्याबाबत ७.३० वाजेपर्यतचा कालावधी मागून घेत अवधी मागून घेतला. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला जाणार की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
आज दिवसभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत एसटी अध्यक्ष अनिल परब यांच्यात तीन बैठका पार पडल्या. या बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेला परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कर्मचारी शिष्टमंडळाचे गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे ही उपस्थित होते.
यावेळी अनिल परब बोलताना म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या ४१ टक्के वेतनवाढ देण्यात येत असून यामुळे ० ते १० वर्षे सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५ हजार रूपयांची वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांचा पगार हा बेसिक १७ हजार ३०० रूपये इतका होणार आहे. जर ज्यांची सेवा ११ ते २० वर्षे झालेली आहे त्या कामगारांच्या वेतनात ४ हजाराने वाढ करण्यात येत आहे. जर या कर्मचाऱ्यांचे वेतन ४७ हजाराच्या जवळपास आहे त्यांचे वेतन ५४ हजारावर होणार आहे. याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ३० वर्षे झालेली आहे त्यांच्या वेतनात ३ हजार ५०० इतकी वाढ करण्यात आली. तसेच त्यांना घरभाडे आणि डिए आदी गोष्टी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात येत असून ही वाढ नोव्हेंबर महिन्यापासून लागू होणार असल्याचे स्पष्ट केले.
याशिवाय कोरोना काळामुळे एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नव्हते. मात्र आता एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या १० तारखेच्या आत वेतन मिळण्याची हमी राज्य सरकारने घेतली आहे. याशिवाय जे कर्मचारी गावाकडे आहेत त्यांनी तात्काळ कामावर हजर व्हावे आणि जे कर्मचारी मुंबईत आहेत त्यांना एक दिवस उशीराने कामावर हजर व्हावे असे आवाहन करत जे कामगार उद्या सकाळी कामावर हजर होतील त्यांच्यावरील निलंबन तात्काळ रद्द करण्यात येणार आहे. जे कर्मचारी कामावर हजरच होणार नाहीत त्यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याबरोबर ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यांच्याबाबत राज्य सरकार सहानूभूमीपूर्वक विचार करण्यात येणार आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
एसटीच्या विलनीकरणाबाबत न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीच्या माध्यमातून निर्णय होणार आहे. त्यामुळे त्याबाबत राज्य सरकारकडून निर्णय घेता येत नाही. तसेच १२ आठवडे कर्मचाऱ्यांचा संप चालू नये यासाठी राज्य सरकारने ४१ टक्के वेतन वाढ देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
या वेतनावाढीमुळे राज्याच्या तिजोरीवर दर महिन्याला ६५ कोटी रूपयांचा भार पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला संप मागे घ्यावे असे आवाहन केले. त्यावर सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर म्हणाले की यासंदर्भात आझाद मैदानावर बसलेल्या कामगारांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय जाहीर करणार असल्याचे यावेळी जाहिर केले.

Check Also

यंदाच्या वर्षात फक्त २५ दिवस सुट्ट्या, ८ दिवसांचा सरकारी कर्मचाऱ्यांचा तोटा राज्य सरकारकडून सुट्यांचे वेळापत्रक जाहीर-शनिवार-रविवारमुळे ८ दिवस अतिरिक्त काम करावे लागणार

मराठी ई-बातम्या टीम यंदाच्या वर्षभरात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक-शाळा-महाविद्यालये, यासह निमसरकारी संस्थांना २०२२ या आगामी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *