Breaking News

सरकारकडून जलयुक्त शिवार योजना राबवूनही मराठवाडा सर्वाधिक तहानलेला १४७० टँकर्सने केला जातो पाणी पुरवठा : तर एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात ५५० टँकरचा वापर

मुंबई : प्रतिनिधी

सततच्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पावसाळी पाण्याची साठवून आणि त्याचा पुर्नवापर करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे ही योजना राबविण्यास सुरुवात केली. मात्र मागील तीन वर्षात राज्यातील जवळपास १६ हजार गावे जलयुक्त शिवार योजनेमुळे दुष्काळमुक्त झाल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात येत असला तरी मराठवाड्यातील ६१५ गावे आणि १६४ वाड्यांमध्ये ७९८ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. राज्याला दुष्काळ आणि टँकर मुक्त करण्यासाठी राबविण्यात येत असल्या तरी राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेली जलयुक्त शिवार योजना आणि शेततळे ही योजना सपशेल अपयशी ठरली आहे. मराठवाड्यातील एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात ५५० टँकर्स सुरु आहेत. येत्या पंधरा दिवसात त्या भागात पाऊस न पडल्यास टँकर्सची संख्या वाढवावी लागणार असल्याची माहिती जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे .

देशाची आर्थिक आणि राज्याची राजधानी मुंबई शहरापासून अवघ्या काही मिनिटाच्या अंतरावर असलेल्या  ठाणे, पालघर या जिल्ह्यांबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील १५९ गावे आणि ४६२ वाड्यांना ९४ टँकर्सने पाणी पुरवठा केला जातो. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगांव, अहमदनगर या जिल्ह्यातील२७९ गावे आणि २८७ वाड्यांना २३१ टँकर्सनी पाणी पुरवठा केला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यातील ५४ गावांना आणि १६४ वाड्यांना ४९ टँकर्सने पाणी पुरवठा केला जातो. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यातील ६१५ गावांना आणि १३४ वाड्यांना ७९८ टँकर्सने पाणी पुरवठा केला जातो. याशिवाय अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यातील २६३ गावांना २५९ पाणी टँकर्सनी पाणी पुरवठा केला जातो. या शिवाय नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील ३५ गावांना ३७ टँकर्सने पाणी पुरवठा केला जातो.

या सर्व उपलब्ध आकडेवारी नुसार राज्यातील जवळपास १ एक हजार ४०५ गावांमध्ये आणि १ हजार ४७ वाड्यांना १ हजार ४७० टँकर्सने पाणी पुरवठा केला जातो. ही परिस्थिती सध्याची असली तरी मागील आठवड्यात अर्थात १४ मे पर्यंत याच गावांमध्ये आणि वाड्यांमध्ये अनुक्रमे १२४५ आणि १३४३ टँकर्सने पाणी पुरवठा केला जात होता.

सध्या दिड हजार टॅकरने पाणीपुरवठा होत असला तरी दोन वर्षाच्या तुलनेत हा आकडा कमी  सांगण्यात येत आहे. राज्य सरकारने गेल्या तीन वर्षात जलयुक्त शिवार योजनेच्या तसेच जलसंधारणाच्या कामांच्या माध्यमातून पाणीसाठा वाढवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला असला तरी पाणीटंचाईचे संकट टळलेले नाही. येत्या पंधरा दिवसांत जर पाऊस पडला नाही तर या टँकर्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

Check Also

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; तर या चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *