Breaking News

समानतेची सुरुवात घराच्या चौकटी पासून करूया मुक्त पत्रकार सिध्दी बोबडे यांचा जागतिक महिला दिनानिमित्त खास लेख

गजबजलेल्या शहरात कामावरून घरी जाण्याची कसरत करत मोबाईल वर येणारे पोस्ट वाचत कशी बशी बस पकडली. मार्च उजाडला नव्हता की वुमेन्स डे च्या पोस्ट यायला सूरवात झाली. सहज म्हणून आठवलं गेल्या आठवड्यात मी गावाला गेले होते. अगदी दोन दिवसांची सुट्टी होती पण चार महिन्यांचा शिण निघाला.
आज आठवडी बाजारात घरात लागणारं समान आणायला जायचं तिथे स्वच्छतागृह ची सोय नाही म्हणून सकाळ पासून कमी पाणी प्यायले हे गावातील वहिनी तिच्या मैत्रीणी ला सांगते आहे. म्हणजे आजूनही खेड्या पाड्यातील स्त्रियांना यासारख्या साध्या दररोजच्या आयुष्यातील समस्यांना तोंड द्यावे लागते आहे.
दोन दिवसांच्या सुट्टी ने प्रवासाने फार थकुन गेले.
इतके थकतो का आपण शहरात? की मानसिक त्राण शहरात जाणवतो? शहरातली स्त्री आणि गावाकडची स्त्री.. विरोधाभास खूप आहेत पण, स्त्रीच्या जगण्यातील अनेक साम्य दोघींमध्ये आहेत. ८ मार्च हा एकमेव दिवस असतो स्त्रीची वाहवा करायला आणि तिची महती गोंजरायला. पण मग यातून साध्य काय व्हावं? प्रगत आणि यशस्वी स्त्री ची व्याख्या नेमकी कोणत्या दृष्टिकोनातून करतो हा आपला समाज ? शैक्षणिक, आर्थिक तर जाऊ द्या पण साधी वैद्यकीय समता देखील पुरवली जात नाही ना. बेटी बचाव मोहीम जोमाने चालते पण बेटी टिकाव मोहीम अवलंबता येईल ना? सक्षम स्त्री तयार करण्यासाठी वैचारिक पातळी सोबत मूलभूत अधिकारांची वानवा होतेच आहे ना. स्त्री चे शारीरिक आणि मानसिक आरोग्य ज्या देशात निरोगी असेल तिथेच खऱ्या अर्थाने स्त्री जन्माचा आदर होईल.
कंडक्टर ने दिलेली टिंग टिंग कानावर आली आणि अंतर्मनात गेलेली माझ्यातली स्त्रीशक्ती भानावर आली.. बस मधून उतरताना सामाजिक वास्तवाचं दडपण आलं. तशी मी सक्षम, साक्षर आणि आर्थिक दृष्ट्या भक्कम पण माझ्या इतर सख्या ( इतर स्त्रिया) अजूनही हाल आपेष्टा सहन करत जगतायत..
स्वभिमनी स्त्रीची प्रतिमा वैचारिक समता असलेल्या घरात शोभते पण आजही ९९% स्त्रिया या स्लेवरी करत आहेत. ( मुद्दाम इंग्रजी शब्द वापरला कारण मूळ मराठी शब्द वापरून खजील व्हायचं नाहीये). स्त्री म्हणजे किचन हे समीकरण बदलायला हवंच आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीच्या बाजूने विचार झालाच पाहिजे. एक मानव म्हणून स्त्रीचा तो मूलभूत अधिकार आहे. सहनशक्ती हा बुरखा काढून टाकायला हवा. का नाही एक आई आपल्या मुलींना स्वाभिमानाने जगायला शिकवत? का नाही स्त्रिया स्वतःहून स्वतःच्या आणि आपल्या मुलींच्या आरोग्याला प्राधान्य देत. आम्ही सहन केलं तुम्ही पण करा हा विचारच मुळी स्त्रीच्या मनात का यावा? आज मासिकपाळी सारख्या नैसर्गिक गोष्टीत सामाजिक भान आणण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. नैसर्गिक गोष्टीत कसली आलीय परंपरा आणि प्रथा? प्रथाच पाळायची आहे तर ती आरोग्याची पाळा.. समतेची पाळा..
ग्रामीण भागातील मुलींपासून स्त्रियांपर्यात सर्वांगीण विकासाची परंपरा पाळा. घरातील कोणताही कार्यक्रम असो राबणार स्त्रियाच.. घरकाम करणार कोण स्त्रियाच.. आदरातिथ्य पाहुणचार करणार कोण स्त्रियाच.. मग ती जॉब करणारी असो नाहीतर गृहलक्ष्मी..
बऱ्याच घरात अजूनही मोठ्याप्रमाणात स्त्री हे सगळं करतच असते. पण जसा घरातीत पुरूष आजारी असेल तेव्हा आराम करतो पूर्णवेळ राजा घेतो. तसं घरातील करती स्त्री आजारी असेल तर कोण करेल हो हे सगळं? ती आजारी असतानाही तिला तू आज भाजी पोळी नको करुस फक्त वरण भाताचा कुकर लाव किंवा आज खिचडी भात कर असे सल्ले दिले जातात. म्हणजे तिला सुट दिले जाते कामा मधूनतीही ५०℅ की इतकं इतकं काम नको करू पण हे थोडं तरी कर…
तिने आराम करूच नये का? तिला तिची स्पेस अजिबात नाही द्यायची का? पुरुषाने बाहेर भटकायचं.. आणि स्त्रियांनी मग त्या जरी कामावर जात असल्या तरी त्यांनी स्त्री असल्याची अमानुष ता दोन्हीकडून सोसायची.. हे नियम कोणी लादले याचा किमान वैयक्तिक पातळीवर किमान विचार होऊन त्यात बदल होणं गरजेचं आहे.
एकदाच आयुष्य मिळालंय सर्वांना आणि तेही कोणताही भेदभाव न करता… जगावं हे सर्वांनाच वाटतं.
“ताई..ओ ताई..आज भाजी नको का? घरातल्यांना जेवण नाही का देणार आज?” घराच्या वाटेवर नेहमीच्या भाजीवाली ने आवाज दिला. माझ्या मनातल्या भावनांना जणू वास्तव आकार यावा तशी ही भाजीवाली समोर दिसत होती.. तिच्या नुसत्या भाजी या शब्दावरून मला घरी जाऊन भाजी करायच्या जबाबदारीच दडपण आलं.. संपूर्ण सभोवतली नजर टाकली आणि दररोज घरी येताना भाजी खरेदी करत घरी येत असलेल्या महिला आठवल्या.
“सलाम मेमसाब” हे आमच्या सोसायटीतील वॉचमन ने मी गेट मध्ये शिरल्या शिरल्या नम्रतेने म्हटलं. मी खूप वेळ त्याच्याकडे बघत बसले.. त्याला म्हणाले,” मुझे सलाम क्यो करते हो? तो घाबरला.. म्हणाला मेमसाब मेरी ड्युटी है..
मी त्याला म्हणाले की आपके बिवी को या बेटी को कभी सलाम किया है?
त्याच्या उत्तरासाठी मी थांबलीच नाही.. अदब, आदर, कौतुक, प्रेम या सहभावनेने रोज वुमेन्स डे साजरा झाला तर समाधान वाटेल.. नाहीतर वाटेवरती अजूनही अडथळे आहेतच. असं समजावत मोबाईल च्या पोस्ट डिलीट करत बसावं लागेल.
मोबाईल ची आठवण झाली.. मोबाईल हातात घेतला आणि कानात हेडफोन्स टाकून मी गॅलरीमध्ये गेले. कोणी विचारलं तर वडील नोकरी करतात आई गृहिणी आहे हे सांगताना देखील अजूनही बरेच जन कुछ नाही करती मेरी माँ, आई काही नाही करत ती घरीच असते असं सांगतात. त्यावरच रेडीओ वर ‘मेरी माँ कुछ नही करती’ असं न सांगता ‘मेरी माँ बहोत कुछ करती है’ सांगायला कशी सुरुवात केली. यावर एक मुलगी तिची प्रतिक्रिया देत होती. ऐकून चेहऱ्यावर मनापासून सुखद स्मितहास्य आलं.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *