Breaking News

अनाथ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार प्रस्ताव तयार करण्याचे आणि अनाथ प्रमाणपत्र वितरणासाठी मोहिम राबविण्याचे राज्यमंत्री कडू याचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी

अनाथ बालकांचा अनाथालयात प्रवेश झाल्यानंतर त्यांना तातडीने अनाथ प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या अनाथ बालकांना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी, असे निर्देश महिला व बालकल्याण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, कामगार, बहुजन कल्याण विभाग राज्यमंत्री बच्चू कडू यांनी येथे दिले. तसेच मागासवर्गीयांच्या धर्तीवर अनाथ तरुणांना बारावी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा प्रस्ताव तातडीने देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

अनाथ बालकांच्या हक्कांसंदर्भात राज्यमंत्री कडू यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी यासंदर्भातील विविध समस्यांचा आढावा घेऊन निर्देश दिले. यावेळी विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

आतापर्यंत किती अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र दिले त्याची माहिती सादर करावी. तसेच प्रमाणपत्र नाकारण्यात आलेल्यांसदर्भात सुनावणी घेण्यात यावी. अनाथालय अथवा अनाथ आश्रम संस्थेतून बाहेर पडलेल्या अनाथांची माहिती गोळा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

अनाथ बालके संस्थेत दाखल झाल्यानंतर एक वर्षाच्या आत त्यांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच या वर्षी दाखल झालेल्या व अद्याप प्रमाणपत्र न मिळालेल्यांसाठी येत्या १४ नोव्हेंबरपासून विशेष मोहिम राबविण्याच्या  सूचना करत ते पुढे म्हणाले की, अनाथ बालकांची व्याख्या बदलण्याची गरज असून ज्या बालकांना कोणीही नातेवाईक नाही, अशा बालकांना संपूर्ण अनाथ समजून त्यांचा ‘अ’ गट करावा. तसेच ज्याचे पालक नाहीत, मात्र त्यांची जात माहित आहे, अशा बालकांना ‘ब’ गटात समावून घेण्यासंदर्भात बदल करणे आवश्यक आहे. तसेच नोकऱ्यांमधील अनाथांसाठी असलेला आरक्षणाचा निकष हा एकूण रिक्त पदाच्या एक टक्केनुसार असावा, यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांचा लाभ अनाथांना होण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. या योजनांमध्ये त्यांच्यासाठी १ टक्का आरक्षण ठेवण्याबाबत व अपंगांच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नातील एक टक्का निधी अनाथांसाठी खर्च करण्यासंदर्भात संबंधित विभागाना सूचित करण्यात यावे. इंदिरा आवास योजनेच्या धर्तीवर संत गाडगेबाबा अनाथ घरकुल योजना राबविण्यात यावी. तसेच अनाथालयात असलेल्या बालकांना त्यांना बालसंगोपन योजना व संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ मिळावा, यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करावे, असे आदेशही  त्यांनी यावेळी दिले.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *