Breaking News

वीरशैव-लिंगायत समाजाच्या मागण्या सोडविण्याचा प्रयत्न करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी

महात्मा बसवेश्वर यांनी मानवतेला भेदभाव विरहीत आणि प्रगतीकडे जाणाऱ्या समाजाचा विचार दिला. वीरशैव लिंगायत समाज त्या विचारांचा पाईक आहे. त्यामुळे या समाजाच्या मागण्यांच्या सोडवणुकीबाबत शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. महात्मा बसवेश्वर यांच्या मंगळवेढा येथील प्रस्तावित स्मारकाचे कामही लवकरच सुरु केले जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.

अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना- शिवा संघटनेच्यावतीने आयोजित महात्मा बसवेश्वर यांच्या ८८७ व्या जयंती द्विपंधरवड्याच्या समारोप तसेच केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंतांच्या सत्कार समारंभात मुख्यमंत्री फडणवीस शुभेच्छापर मनोगतात बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महात्मा बसवेश्वरांनी मानवतेचा धर्म उभा केला. समाज ज्या काळात कर्मकांड, उच्च-नीच भेदामध्ये अडकलेला होता. अशा काळात त्यांनी मानवतेचा आणि समानतेचा विचार दिला. तोही सोप्या पद्धतीचा. या विचारातून एक राज्य तयार झाले. ज्यामध्ये भेदभावाला थारा नव्हता. स्वातंत्र्य, उन्नती आणि प्रगतीकडे जाणाऱ्या समाजाचा विचार होता. त्यामुळेच आजही शेकडोवर्षांनंतरही आपण महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करतो. त्यांना वंदन करतो. वीरशैव लिंगायत समाज महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा पाईक आहे. त्यामुळे काल ओघात या समाजासमोर काही प्रश्न, अडचणी निर्माण झाल्या असतील, तर त्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील. यासाठी चर्चेद्वारे समाजाभिमुख निर्णय घेतले जातील.

सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवा संघटनेचे अखिल भारतीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार शिवशरण पाटील-बिराजदार यांच्यासह संघटनेचे राज्यभरातील जिल्हा, तालुकास्तरावरील पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *