मुंबईः प्रतिनिधी
बीडच्या पूजा चव्हाण या तरूणीने केलेल्या आत्महत्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला. चव्हाण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी याकरीता आपण राजीनामा दिल्याचे स्पष्टीकरण राठोड यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले. यावेळी त्यांच्यासोबत सांसदीय कार्यमंत्री अनिल परब, शिवसेनेचे सचिव अनिल देसाई हे ही सोबत होते.
चव्हाण आत्महत्याप्रकरणावरून माझ्यावर, माझ्या समाजाच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर मोहिम चालविण्यात आली. तसेच मला राजकिय जीवनातून उठविण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि सत्य आहे ते बाहेर यावे यासाठी आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले.
वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मुद्यावरून भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ, चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला चांगलेच घेरत राठोड यांच्या राजीनाम्याशिवाय विधिमंडळाचे कामकाज चालवू देणार नसल्याचा इशारा दिला होता. तसेच सरकारच्या विविध समित्यावर असलेल्या भाजपाचे सदस्य राजीनामा देतील असेही जाहीर केले. त्यामुळे अखेर राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे बोलले जात आहे.
आज दुपारी संजय राठोड हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर गेले होते. त्यावेळी राठोड यांनी समाजाच्या महंतांशी फोनवरून बोलण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. परंतु मुख्यमंत्र्यांनी महंताशी बोलण्यास नकार दिला.
दरम्यान, शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काल राठोड यांचा राजीनामा घेण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ट्विट करत त्यात राजधर्माचे पालन होणार असल्याची स्पष्टोक्ती देत राठोड यांचा राजीनामा घेत असल्याचे स्पष्ट संकेतच सकाळी दिले. त्यामुळे संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याचे चित्र सकाळीच स्पष्ट झाले.
