Breaking News

वंचित आणि वारकऱ्यांच्या आंदोलनाला यश पण मंदिरे उघडणार ८ दिवसांनी अॅड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

पंढरपूर-मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी केंद्र सरकारने अनलॉक-३ मध्ये परवानगी दिली. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील मंदिरे उघडण्यास परवानगी नाकारली. त्यानंतर भाजपाकडून याप्रश्नी आंदोलनही केले. परंतु राज्यातील वारकरी सांप्रदाय आणि वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पंढरपूरातील विठ्ठल मंदिर उघडावे यासाठी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले असून विठ्ठल मंदीरासह राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यासाठी ८ दिवसात एसओपी (मार्गदर्शक तत्वे) जाहीर करण्यात येणार असून मंदिरे माविकांसाठी खुली करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिल्याचे वंचित आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

केंद्राने परवानगी देवूनही राज्यातील मंदिरे उघडण्यास राज्य सरकारने नकार दिला. त्यामुळे भाजपाने याप्रश्नी आंदोलन करत राज्यभर घंटानाद आंदोलन केले. मात्र त्यास जनतेतून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आज प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरात होणाऱ्या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर राज्यातील अनेक भागातून वारकरी आणि वंचितचे कार्यकर्त्ये शिवाजी चौकात जमा झाले. आंबेडकरांचे आगमन झाल्यानंतर सुरुवातीला स्थानिक पोलिस प्रशासनाने त्यांची भेट घेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी फोनवरून चर्चा करून दिली. त्यानंतर त्यांनी काही काळ पुढील निरोपाची वाट पाहिली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणताच निरोप आला नसल्याने अखेर ते मंदिराच्या दिशेने निघाले. तेथे पोहोचल्यानंतर मी नियम तोडण्यासाठी आलो आहे हवे तर तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करा असे आव्हान स्थानिक प्रशासनाला देत मंदिरात जाणार असल्याचे आंबेडकर यांनी जाहीर केले.

दरम्यानच्या काळात राज्य सरकारकडून लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचा निरोप स्थानिक पोलिस प्रशासनाकडून आंबेडकर यांना देण्यात आला. त्यामुळे त्यांनी मंदिर मार्गावरच थांबणे पसंत केले. त्यानंतर काही काळानंतर राज्य सरकारकडून त्यांना विठ्ठल मंदीरात जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांना  परवानगी देण्यात आली. आंबेडकर आणि वारकरी संप्रदायाचे काही निवडक लोकांबरोबर त्यांनी मंदिरात जावून दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आंबेडकर म्हणाले की, आठ दिवसात मंदिरातील प्रवेशाबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात येणार असून त्यानंतर राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा झाल्याचे आंबेडकरांनी सांगितले.

यासंदर्भात शिवसेनेचे प्रवक्त खासदार संजय राऊत यांनी ज्यांनी देशाचे संविधान लिहिले आहे, त्यांचे वारसदार हे प्रकाश आंबेडकर आहेत. त्यामुळे त्यांनी कायद्याचे उल्लंघन करू नये तसेच आरोग्याच्या प्रश्नी तरी त्यांनी अशी भूमिका घेवू नये असे आवाहन केले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *