Breaking News

ग्राहकांनो वीजबिले चेकने नव्हे तर ऑनलाईन पध्दतीने भरा महावितरणचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकेतील कामकाजावर परिणाम झालेला असून वीजबिलांचे धनादेश उशिरा वटत असल्याने वीजग्राहकांनी वीजबिलांचा भरणा करण्यासाठी धनादेशाऐवजी ऑनलाईन पर्यायांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
जून महिन्यात प्रतिबंध क्षेत्र वगळता उर्वरित भागात लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर महावितरणने वीजमिटरचे रीडिंग व वीजबिलांचे वाटप तसेच वीजबिल भरणा केंद्र सुरू केले आहे. जूनमध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांच्या अचूक वीजवापराचे मीटर रीडिंगप्रमाणे वीजबिल देण्यात आले आहे. त्याबाबतचा संभ्रम दूर होऊन आता वीजबिल भरण्यास वेग आला आहे.
ग्राहकांनी धनादेशाद्वारे वीजबिलांचा भरणा केला असेल तर नियमानुसार ज्यादिवशी धनादेश वटविला जाईल त्याच दिनांकाला सदर रक्कम ग्राहकाच्या खात्यावर वर्ग केली जाते. मात्र, लॉकडाऊनमुळे अनेक बँकांमध्ये मनुष्यबळांची संख्या मर्यादित असून प्रतिबंध क्षेत्रातील बँक बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकाने वीजबिलाकरिता धनादेश दिला असेल तर बँकांकडून धनादेश वटविण्यास उशिर होत आहे. वीजबिलांच्या देय मुदतीनंतर धनादेश वटल्यास पुढील महिन्याचे वीजबिल थकबाकीसह येण्याची शक्यता आहे. तसेच काही कारणास्तव धनादेश बाऊंस झाल्यास मा.महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यासाठी ७५० रुपये दंड देखील पुढील वीजबिलात लागू शकतो. यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो.
तसेच कोविड -19 च्या प्रादुर्भावामध्ये धनादेश जमा करण्यासाठी बँका किंवा महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रात जाण्याचा धोका पत्करण्याऐवजी घरबसल्या ऑनलाईन पर्यायांद्वारे वीजबिलांचा भरणा करणे सद्यस्थितीत सोयीस्कर आहे. ग्राहकांनी धनादेशाऐवजी आपल्या वीजबिलांचा भरणा करण्यासाठी ऑनलाईनला प्राधान्य द्यावे. ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी महावितरण मोबाईल ॲप तसेच www.mahadiscom.in या वेब साईटचा वापर करावा. याशिवाय वीजबिलांवर महावितरणच्या बँकेचे छापील तपशील असणाऱ्या ग्राहकांनी आरटीजीएस व एनईएफटीचा वापर करावा, असेही आवाहन महावितरणने केले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *