Breaking News

राहुल गांधी यांनी सांगितला भारत जोडो यात्रेचा स्वानुभव, मी अहंकाराने यात्रा सुरु केली होती पण… माझ्या पायांना वेदना होत होत्या पण माझ्या चेहऱ्यावर हासू होते, रडावसं वाटत होते

मागील दोन दिवसांपासून काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन छत्तीसगड येथील रायपूर येते सुरु होते. या अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने आलेला स्वानुभव सांगताना म्हणाले, चार महिने कन्याकुमारी ते श्रीनगर अशी भारत जोडो यात्रा आम्ही काढली. व्हिडिओत तुम्ही माझा चेहरा पाहिला. मात्र आमच्यासोबत लाखो लोकं चालत होते. प्रत्येक राज्यात लोक आमच्यासोबत चालले. उन, वारा, पाऊस, थंडी यांची पर्वा न करता लोक भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. भारत जोडो यात्रा मला खूप काही शिकवून गेली. भारत जोडो यात्रेमुळे माझा अहंकार नष्ट झाल्याचा कबुली राहुल गांधी यांनी दिली. त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य चर्चेत आले.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, मी व्हिडिओ पाहात होतो तेव्हा मला अनेक आठवणी आल्या. तुम्ही सगळ्यांनीही पाहिलं असेल पंजाबमध्ये एक मॅकेनिक येऊन मला भेटला. मी त्याचे हात हातात घेतले त्यानंतर अनेक वर्षांचे त्याचे प्रयत्न, त्याच्या वेदना या मी ओळखल्या. अशाच प्रकारे लाखो शेतकऱ्यांना मी भेटलो. त्यांच्याशी हात मिळवलं, त्यांना भेटलो की मला त्यांच्या व्यथा कळत असत.

कन्याकुमारी येथून सुरु झालेली यात्रा केरळमध्यो पोहोचल्यावरचा अनुभव सांगताना राहुल गांधी म्हणाले, केरळच्या बोट रेसमध्ये मी बोटीत बसलो होतो तेव्हा पूर्ण टीम सह मी पुढे चाललो होतो. माझ्या पायात खूप वेदना होत होत्या. फोटो काढले जात होते पण मी हसत होतो, पण रडावंसं वाटत होतं इतक्या वेदना होत्या. मी यात्रा सुरू केली तेव्हा मला एक अहंकार होता की मी तर आरामात ही यात्रा पूर्ण करेन. माझ्या मनात ही बाब तेव्हा होती. मात्र त्याचवेळी जुन्या एका जखमेने डोकं वर काढलं. मी महाविद्यालयात असताना फुटबॉल खेळत असताना माझ्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर ही दुखापत बरी झाली. मात्र मी जेव्हा भारत जोडो यात्रा सुरू केली तेव्हा या वेदना परत होऊ लागल्या.
तुम्ही सगळे माझं कुटुंब आहात तुम्हाला मोकळेपणाने सांगतोय. मी रोज सकाळी हाच विचार करायचो रोज कसं चालू? मला रोज प्रश्न पडायचा. मी कंटेनरमधून उतरायचो आणि चालायला सुरूवात करायचो. लोकांना भेटायचो, पहिल्या दहा पंधरा दिवसात माझा अहंकार संपला असंही राहुल गांधी यांनी सांगत माझा अहंकार का संपला कारण, भारतमातेने मला हा संदेश दिला की तू निघाला आहेस, तुला कन्याकुमारी ते काश्मीर चालायचं आहे तर आधी अहंकार संपव. मला ही भारतमातेनेच दिलेली साद होती. मी ते ऐकलं, त्यामुळेच माझी भारत जोडो यात्रा यशस्वी झाली असंही राहुल गांधी सांगितले.

आधी मी शेतकऱ्यांना भेटायचो तेव्हा मी त्याला काही उपदेश करण्याचा प्रयत्न करायचो. माझ्या परिने त्यांना सांगू लागायचो. मात्र हळूहळू हे सगळं बंद झालं. एक शांतता मला लाभली. त्या शांततेत मी लोकांचं म्हणणं गांभीर्याने ऐकू लागलो. हे सगळे बदल हळूहळू झाले. त्यानंतर जेव्हा मी काश्मीरला पोहचलो तेव्हा मी खूपच शांत झालो होतो असंही राहुल गांधी यांनी सांगितले.

भारत जोडो यात्रेने काश्मीर खोऱ्यातील तरुणांच्या मनात राष्ट्रवाद जागृत केला, असा दावाही राहुल गांधींनी केला. काश्मीर खोऱ्यात अगदी अनंतनाग, पुलवामा अशा दहशतवादग्रस्त इलाख्यातदेखील हजारो काश्मिरी तरुण हातात तिरंगा घेऊन यात्रेत सहभागी झाले होते. काश्मिरी तरुणांनी स्वतःहून तिरंगा हाती घेतलेले अद्भुत वातावरण मी कधीही पाहिले नव्हते, असे केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान सांगत होते, असे राहुल गांधी म्हणाले.

संसदेमध्ये मोदी म्हणाले की, त्यांनीही श्रीनगरमध्ये लालचौकात तिरंगा फडकावला होता. पण, त्यांनी १५-२० लोकांसोबत तिरंगा फडकावला होता, पण, यात्रेतील काश्मिरी तरुणांनी तिरंगा फडकावला. तिरंग्यामुळे येणारी राष्ट्रवादाची भावना काँग्रेसमुळे या तरुणांमध्ये निर्माण झाली, असे राहुल गांधी म्हणाले.

भारत जोडो’ यात्रेने माझ्यातील अहंकार काढून टाकला. यात्रेच्या सुरुवातीच्या काळात मी लोकांनाच ज्ञान देण्याचा प्रयत्न करत होतो पण, मी लोकांचे ऐकू लागलो, त्यांच्या भावना-दुःख समजू लागलो. मी आतून शांत होत गेलो. जम्मू-काश्मीरला पोहोचेपर्यंत मी ध्यान लागल्यासारखा गप्प झालो. यात्रेमध्ये मला हजारो लोक भेटले. यात्रा हेच माझे घर झाले. तिथल्या महिलांच्या, तरुणांच्या वेदना मी तुम्हाला ऐकवू शकतो पण, त्यांच्या भावना समजावून सांगू शकत नाही. तिथे लोकांशी माझे नाते बदलून गेले, अशा भावनिक शब्दांत राहुल गांधींनी पदयात्रेचा अनुभव सांगितला. भारत हा पुजाऱ्यांचा नव्हे तपस्वींचा देश आहे. ‘भारत जोडो’ यात्रा ही तपस्या होती, या तपस्येतून काँग्रेसलाच नव्हे देशालाही उर्जा मिळाली. ही तपस्या बंद होऊन चालणार नाही. भाजपा-संघाविरोधात लढायचे असेल तर सगळ्यांनी घाम गाळून तपस्येत सहभागी झाले पाहिजे. अख्खा भारत आपल्यासोबत येईल, असा आशावाद राहुल गांधींनी व्यक्त केला.

Check Also

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *