Breaking News

नाना पटोले म्हणाले, नारीशक्ती मोठी…तर मोदींचा पराभव अटळ

नारीशक्ती ही मोठी शक्ती असून महिलांची लोकसंख्या ५० टक्के आहे. महिलांनी मतदानात सक्रीय सहभाग घेतला तर मोदी सरकारचा पराभव अटळ आहे. मोदी सरकारच्या काळात महागाई प्रचंड वाढली असून या महागाईचा सामना सर्वात आधी महिलांना करावा लागतो. महागाईने जगणे कठीण झाले आहे. महागाईच्या मुद्द्यावर महिला काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारला पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची बैठक टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीला नाना पटोले मार्गदर्शन करत होते. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेट्टा डिसुझा, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे व राज्यभरातील महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षात महिलांना सन्मान दिला जातो, इंदिराजी गांधी या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या तर सोनियाजी गांधी यांना पंतप्रधान बनण्याची संधी चालून आली होती पण त्यांनी ते पद नाकारले, त्या त्यागमूर्ती आहेत. तुम्ही पहिला काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत ही तुमची मोठी ओळख आहे. या पदाचा वापर काँग्रेस पक्ष संघटन वाढवण्यासाठी करा. महागाईचा मुद्दा हे मोठे शस्त्र तुमच्या हातात आहे, त्यावर सरकारविरोधात आंदोलन केले पाहिजे. मुंबई व महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत त्यावर आवाज उठवला पाहिजे. तुम्ही कमजोर समजू नका, तुमच्यातला न्यूयगंड काढून टाका. लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा आणि दिल्लीतल्या मोदी सरकारचा पराभव करा, असे आवाहन पटोले यांनी केले.

यावेळी बोलताना महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेट्टा डिसुझा म्हणाल्या की, माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण दिले आहे, राजकारणात महिलांचा सहभाग वाढवण्याचे ऐतिहासिक काम राजीवजी गांधी यांनी केले आहे. ५० टक्के संधी दिली तशी ५० टक्के जबाबदारीही आपल्यावर आहे हे विसरू नका. तुम्हाला दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडा. कर्नाटकात घरोघरी जाऊन महिलांनी प्रचार केला व विजयात हातभार लावला. यापुढील प्रत्येक निवडणुकीत महिलांनी प्रचारात हिरीरीने भाग घेतला पाहिजे. कोणतेही पद कायम नसते, पक्षाने आपल्याला जबाबदारी दिलेली आहे त्याला न्याय देण्याचे काम करा. २०२४ च्या निवडणुका जवळ आल्या आहेत, मेहनत करा आणि काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करा असेही नेट्टा डिसुझा म्हणाल्या.

महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यावेळी म्हणाल्या की, राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. मुंबईत लोकलमध्ये मुलीवर अत्याचार झाला, चर्चेगेटजवळ महिला वसतिगृहात मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. मुंबईत एका नराधमाने महिलेचे तुकडे करण्याचा अत्यंत अश्लाघ्य प्रकार केला. राज्याच्या इतर भागातही महिला अत्याचारांच्या घटना वाढलेल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकार महिला अत्याचार थांबवण्यात अपयशी ठरले आहे. महिला काँग्रेसने केंद्र व राज्यातील भाजपा सरकारविरोधात सातत्याने आवाज उठवला असून यापुढेही महिलांच्या प्रश्नांसह जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवेल. आगामी निवडणुकांत महिलाही मोठ्या संख्येने प्रचारात उतरतील व काँग्रेसला विजयी करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावतील असेही सव्वालाखे म्हणाल्या.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

Telangana Election : मतदारांना उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन, जाणून घ्या, कोणत्या जागा विशेष !

Telangana Election : ११९ सदस्यीय तेलंगणा विधानसभेसाठी गुरुवारी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *