Breaking News

फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर शरद पवार यांचा पलटवार, हे ही त्यांच अज्ञानच… मी सर्वांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं होतं, तेव्हा फडणवीस शाळेत असतील

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमेकांवर टोलेबाजी चालू असताना दुसरीकडे फडणवीसांनी शरद पवारांविषयी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. चंद्रपूरमध्ये मोदी सरकारच्या ९ वर्षपूर्तीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीकास्र सोडलं. यावेळी त्यांनी शरद पवारांचा उल्लेख करत १९७८ च्या घडामोडींचा संदर्भ दिला. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं.

आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना पत्रकारांनी या वक्तव्याविषयी विचारणा केली असता त्यांनी त्यावरून फडणवीसांनाच टोला लगावला. मी कधी मुत्सद्देगिरी केली? त्यांनी सांगावं. १९७७ साली आम्ही सरकार बनवलं. पण त्यावेळी भाजपा माझ्यासोबत होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस लहान असतील. त्यामुळे त्यांना कळलं नसेल. त्यांना कदाचित पुरेसा इतिहास माहिती नसेल. पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो, की मी सगळ्यांना घेऊन सरकार बनवलं होतं. त्यावेळच्या जनसंघाचे उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री होते. इतरही काही सदस्य होते, असं म्हणाले.

तसेच मला वाटतं देवेंद्र फडणवीस कदाचित तेव्हा प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे त्यांना तेव्हाची फारशी माहिती नसेल. ते अज्ञानापोटी असं वक्तव्य करत आहेत. यापेक्षा काही फारसं भाष्य करण्याची गरज नाही, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसींना फक्त दाखवण्यापुरतं घेतलं जातं, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली होती. त्यावरूनही शरद पवारांनी त्यांच्यावर टीका केली. हे ही फडणवीसांचं अज्ञानच आहे. राष्ट्रवादीचे पहिले महाराष्ट्राचे अध्यक्ष छगन भुजबळ होते. त्यानंतर पिचड होते. सुनील तटकरे होते. हे सगळे कोण आहेत? ही सगळी यादी बघा. अर्थात त्यांचं वाचन किती आहे ते मला माहिती नाही. या सगळ्या गोष्टींची नोंद न घेता ते विधानं करतात. ठीक आहे, लोकांना माहिती असतं. त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो वास्तवाला धरून नाही, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

Check Also

माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आता एकांगी की चुरसीची ?

लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु झालेली असतानाच काही लोकसभा मतदारसंघातील लढती या फारच रंजक होणार असल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *