Breaking News

शिंदे गटाच्या टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, त्या आमदारांची मला कीव येते… गद्दार सरकारमध्ये मंत्रीपदासाठी काय काय करावं लागतं

पावसाळी अधिवेशन संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेले असताना शिंदे समर्थक गट आक्रमक झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. काल महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करत धक्काबुक्की केल्याचे प्रकरण शिंदे गटाकडून घडवून आणण्यात आल्यानंतर आज शिंदे गटाने थेट शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत टीका केली. सत्ताधारी आमदारांकडून विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना चोख प्रत्युत्तर देत आव्हानच दिले.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आमदारांची आपल्याला कीव येते, गळ्यात पोस्टर लावून त्यांना कसं उभं केलंय. एका मंत्रीपदासाठी या गद्दार सरकारमध्ये किती काय करायला लागतं. मला खरोखर यांची कीव येते. यांच्यावर घरात चांगले संस्कार झाले असते, तर आधी गद्दारी केली नसती आणि असे बिचाऱ्यासारखे उभे राहिले नसते असा खोचक टोलाही लगावला.

मला एवढंच दु:ख वाटतं की या लोकांना आम्ही कमी काय केलं? ४० वर्षांत कोणत्या मुख्यमंत्र्यांनी खाती सोडली नसतील, अशी खाती या लोकांना आम्ही दिली. आम्ही त्यांना सर्वकाही दिलं. आमच्याच पाठीत खंजीर खुपसून आज ते पायऱ्यांवर उभे आहेत. या ४० लोकांसोबत विश्वासघात झाला आहे. त्यांना काय काय गळ्यात घालून आमच्यासाठी उभं केलं आहे. आम्हाला शिव्या दिल्यावर मंत्रीपदं मिळतील हे आजचं चित्र आहे असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

ज्यांनी हे बॅनर्स गळ्यात घातले आहेत, त्यांनी शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी आवाज उठवला असता तर मंत्रीपदं मिळतील असे संकेत महाराष्ट्रात गेले असते, तर खरंच राज्य पुढे चाललंय असं वाटलं असतं. आजही हे स्वत:चाच विचार करत आहेत. हे सगळं आज जगजाहीर झालंय. त्यामुळे यांच्यावरचे संस्कार लोकांसमोर आले आहेत असे सांगत खरमरीत शब्दांत टीकाही केली.

चला ना, ४० लोकांनी राजीनामा द्यावा, मीही देईन. आपण निवडणुका लढवू. मी तर म्हणतो की विधानसभा बरखास्त करा, संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका लावा. होऊन जाऊ दे एकदाचं, असं आव्हानही त्यांनी आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला दिले.

ज्याची भिती वाटते, त्याच्यावर टीका जास्त केली जाते. पायऱ्यांवर उभे असणाऱ्यांची कीव येते. त्यांना खरी अपेक्षा होती मंत्रीपदांची. ती मिळाली नाही, म्हणून त्यांना श्रेष्ठींना खुश करण्यासाठी माझ्याविरोधात बोलायला लागतंय. गळ्यात काय काय घालून उभं केलं जातंय. ही निदर्शनं करताना त्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसतंय. चेहऱ्यावर भिती दिसत आहे. महाराष्ट्रात गद्दारी पटलेली नाही हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय. चांगल्या प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून हे गेले आहेत असेही ते म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *