Breaking News

मणिपूर येथील घटनेचे राज्य विधिमंडळात पडसाद, काँग्रेसचा सभात्याग काँग्रेसच्या महिला आमदारांकडून गोंधळ

मागील दोन महिन्याहून अधिक काळ मणिपूरमधील हिंसाचार धुमसत असताना त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतेही भाष्य केले नाही की, हिंसाचार थांबविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यातच मणिपूर येथील दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर गॅगरेप केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशातील विरोधी पक्षांसह परदेशातून मोठ्या प्रमाणावर मोदी सरकारवर टीका सुरु झाली. त्यानंतर काल पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा भाष्य केले. परंतु याआधी अनेक उच्चस्तरीय बैठकाही होऊनही गुन्हा दाखल झाल्यावर तब्बल ६२ दिवस हे प्रकरण धुळखात पडलं होतं. ६२ दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी कोणतीही मोठी कारवाई झाली नव्हती. त्यामुळे मणिपूर सरकारचा निषेध केला जात आहे.

मणिपूरमधील या घटनेचे पडसाद आज थेट महाराष्ट्राच्या विधिमंडळात या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला. विरोधी पक्षांमधील महिला आमदारांनी मणिपूर प्रकरणावर बोलण्याची परवानगी मागितली. परंतु विधानसभा अध्यक्षांनी ही परवानगी नकारल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदार संतापल्या. या आमदारांनी अधिवेशनातून सभात्याग करत निषेध नोंदवला.

विधिमंडळाबाहेर पडल्यानंतर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मणिपूरमधील घटनेचा निषेध नोंदवला. तसेच सभात्याग करण्याचं कारणही सांगितलं.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या, मणिपूरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तिथे दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढण्यात आली. त्या घटनेसंदर्भात बोलण्यासाठी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे वेळ मागितला. परंतु आम्हाला बोलू दिलं नाही. मणिपूरच्या घटनेचा देशभरातील लोक निषेध करत आहेत. आम्हाला वाटतं की, विधिमंडळाच्या माध्यमातून याबाबत एक ठराव झाला पाहिजे. त्या महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे. मणिपूर सरकारचा धिक्कार झाला पाहिजे. यासंदर्भात ठराव व्हावा, अशी भावना आम्ही व्यक्त केली. परंतु आम्हाला बोलायची संधी मिळाली नाही. विधानसभा अध्यक्षांकडे आम्ही यासाठी पाच मिनिटं मागितली. परंतु आम्हाला वेळ दिला नाही. त्यामुळे आम्ही सभात्याग केल्याचे सांगितले.

पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, मणिपूरमधील घटनेसंदर्भात बोलण्याची संधी द्यावी, यासाठी केवळ पाच मिनिटं द्यावी अशी विनंती आम्ही अध्यक्षांकडे सातत्याने केली. परंतु दुर्दैवाने यासंदर्भात बोलण्यासाठी आम्हाला पाच मिनिटंसुद्धा दिली नाहीत. आम्ही महिला सदस्य सातत्याने बोलण्याची परवानगी मागत होतो. एक मिनिट द्या म्हणत होतो, परंतु अध्यक्षांनी आमचं म्हणणं ऐकलं नाही, आम्हाला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांचा निषेध करून आम्ही विधिमंडळातून बाहेर पडलो.

दरम्यान, काँग्रेसच्या महिला आमदारांनी गोंधळ तसाच सुरु ठेवल्याने विधानसभआ अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, तुम्ही उपस्थित केलेला प्रश्न महत्वाचा आहे त्याबाबत कोणाचेही दुमत नाही. तुम्ही कोणतीही सूचना न देता थेट असा मुद्दा उपस्थित करू शकत नाही. तुम्ही मला दालनातही प्रस्ताव दिला नाही की, विधानसभा सचिवांकडेही प्रस्ताव दिला नाही. त्यामुळे तुम्ही योग्य मार्गाने प्रस्ताव दाखल करा आपण त्यावर निश्चित निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *