Breaking News

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल, नोटाबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण ? नोटबंदीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आंबेडकरांची प्रतिक्रिया

रिझर्व बँक ऑफ इंडियाने १० मार्च २०१७ रोजी त्यांच्या प्रकाशनामध्ये नोटाबंदीचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावर विपरीतपणे झाला आहे असे म्हटले आहे. तथापि सर्वोच्च न्यायालयाने २०१६ च्या नोटबंदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना अचानकपणे घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूची कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. कोणत्याही सिरीजच्या नोटा रद्द करणे किंवा त्या पुन्हा चलनात आणणे किंवा नोटबंदी करणे यामध्ये केंद्र सरकारने काय भूमिका घ्यावी याविषयीच्या संवैधानिक मुद्यावर अपेक्षित निकाल देण्यास सर्वोच्च न्यायालय सपशेल अपयशी ठरले आहे. या प्रश्नाला उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाने भविष्यात चलनच धोक्यात आणले आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नोटबंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर प्रसिध्दीपत्रकान्वये प्रतिक्रिया व्यक्त केली.

यावेळी बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले की, नेहमी बँकेतल्या नोटा बंद करण्याचा निर्णय आरबीआय घेते, केंद्र सरकार घेत नाही. मागे १९७८ मध्ये १०,००० रुपये चलनाची नोट बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला होता आणि भारत सरकारला कळवला होता. हे अगोदरचे उदाहरण असताना सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारने घेतलेल्या निर्णयावर कोणतीही टीका टिपण्णी केली नाही.

आरबीआयच्या कायद्याप्रमाणे Section 22 मध्ये रिजर्व्ह बँकेलाच बँक नोट जारी करण्याचा अधिकार आहे. केंद्र सरकारला नोटा प्रिंट करण्याचा, वितरीत करण्याचा अथवा रद्द करण्याचा अधिकार नाही. रिझर्व बँक केंद्र सरकारच्या आणि इतर भागधारकांच्या सल्ल्याने बँक नोटांची संख्या आणि नोटांची छपाई करते. RBI Act, 1934 प्रमाणे Section 22 मधील Sub – Section 2 मध्ये दिल्याप्रमाणे आरबीआयला केंद्रिय बोर्डाच्या शिफारशी नुसार बँक नोट चलनातून काढून टाकता येते. रुपयाची क्रयशक्ती स्थिर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय खूप पुढे जाऊन निकाल देऊ शकले असते, परंतु हा निकाल उपरोक्त कलमे लक्षात घेता तुष्टीकरणाशिवाय काही नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

हे एक चांगले झाले की, न्यायमूर्ती नागरत्न म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय हा बेकायदेशीर आहे आणि यामध्ये आरबीआयने स्वतःची स्वतंत्र बुध्दी न वापरता २४ तासात केलेला निर्णय आहे. तथापि, हा प्रश्न शिल्लक राहतोच की, नोटाबंदीच्या बेकायदेशीर आणि अनियमिततेच्या निर्णयामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *