Breaking News

उद्धव ठाकरे यांची खोचक टीका,… ते पुन्हा अचानक कालावधी वाढवू शकतील…

आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्या निकालात न्यायालयाने स्पष्टपणे आदेश देत विहित कालावधीत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे सांगितले आहे. तरीही विधानसभा अध्यक्षांनी आतापर्यंत तीन ते चार वेळा मुदत वाढ घेतली आहे. यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या वेळखावू पध्दतीच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत. मात्र उद्या १० जानेवारी २०२४ आमदार अपात्रतेच्या सुनावणीवर निकाल देणार असल्याचे स्वतः विधानसभाध्यक्षांनीच जाहिर केले आहे. मात्र त्यांची सुनावणी दिल्लीतल्या आदेशानुसार चालते. त्यामुळे त्यांचे काय ते उद्याही अचानक निकाल जाहिर करण्याचा कालावधी वाढवू शकतील असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लगावला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मागील दिडवर्षापासून शिवसेना नेमकी कोणाची यावर न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेना उबाठा आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही बाजूंकडील आमदारांची साक्ष, कागदपत्रे आदींप्रकरणी सुनावणी घेतली. आता सुनावणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर या सुनावणीचा निकाल उद्या अर्थात १० जानेवारी २०२४ रोजी जाहिर करणार असल्याचे जाहिर केले. यापार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वांद्रे येथील त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत अनिल परब हे ही उपस्थित होते.

.यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विहित कालवधीचा अर्थ एक तर महिनाभरात किंवा तीन महिन्यात असा होतो. परंतु त्यावर एक वर्षाहून अधिक काळ सुनावणी विधानसभाध्यक्षांनी घेतली. का तर म्हणे, त्यांना लोकसभेवर की राज्यसभेवर खासदार म्हणून निवडूण जायचे आहे. त्यातच विधानसभा अध्यक्ष ज्याच्या विरोधात निकाल देणार आहेत त्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या घरी अचानक जातात. मी ही मुख्यमंत्री होतो पण तेव्हाचे विधानसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष हे काय अचानक माझ्या घरी येत नव्हते असा उपरोधिक टोलाही मुख्यमंत्री शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीवर लगावला.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आतापर्यंत विधानसभा अध्यक्षांनी तीन ते चार वेळा सुनावणीसाठी मुदत वाढ सर्वोच्च न्यायालयाकडून घेतली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हे उद्याच निर्णय घेतील अशी शाश्वती वाढत नाही. कदाचीत दिल्लीवरून आदेश आला तर ते पुन्हा निकाल जाहिर करण्यासाठीही मुदतवाढ देऊ शकतात अशी टीकाही केली.

पेशवे काळातील रामशास्त्री प्रभुणे यांचा संदर्भ देताना उद्धव ठाकरे म्हणाले, मला माहित नाही की त्या काळी लोकसभा, राज्यसभा होती का ते. पण तेव्हा रामशास्त्री प्रभुणे यांनी पेशव्यांच्या विरोधातील खटल्यावर निकाल देताना जो कणा दाखवित स्वतःच्या पदाची काळजी न करता त्यांनी जो निकाल दिला तो तसा निकाल आताचे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर हे दाखवू शकतील का असा सवाल करत पण त्यांना आता पुढचे वेध लागले आहेत. त्यामुळे रामशास्त्री असण्याची जबाबदारी त्यांच्या दिल्लीच्या इशाऱ्यावर असून वरून आदेश येईल तेव्हा ते निकाल जाहिर करतील. किंवा त्या पदावरून स्वतःच पाय उतार होतील असा संशयही व्यक्त केला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात आम्ही यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांच्या वेळकाढूपणाबाबत गेलो आहोत. त्यामुळे ते जे काही निर्णय देतील त्या विरोधात आम्ही जाणारच असून त्यात आजच्या विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीचा मुद्दाही याचिकेत उपस्थित करणार असल्याचा इशाराही दिला.

यावेळी शिवसेना उबाठा गटाचे नेते अनिल परब म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिलेल्या निकालात व्हिप कोणाचा मानावा, कोणत्या गट नेत्याचे नाव अंतिम मानावे निवडणूक आयोगाच्या तरतूदीप्रमाणे आणि १० परिशिष्टनुसार कोणाचा खरा पक्ष मानावा यासंदर्भात स्पष्ट केले आहे. तरीही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तीन महिन्यात निकाल देणे अपेक्षित असताना त्यास दिड वर्षाचा कालावधी घेतल्याचे सांगत फक्त वेळकाढूपणा करण्यासाठी या गोष्टी करण्यात आल्याचा आरोपही केला.

अनिल परब म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांसमोर ज्या आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका आहे. त्या यादीमध्ये पहिले नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे. तरीही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अपात्र ठरणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या घरी जातात. कायद्याने असे करता येत नाही. तरीही ते गेले त्यामुळे उद्यांच्या निकालाबाबत संशयास जागा रहात असल्याचेही नमूद केले.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *