Breaking News

आदिवासींच्या विकासासाठी भाजपा कटीबद्ध भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे प्रतिपादन

नवापूरः प्रतिनिधी
स्वातंत्र्यानंतर ५५ वर्षे देशाची सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने आजवर आदिवासीचा वापर फक्त मतांसाठी केला. गेल्या पाच वर्षांत आदिवासींच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक निर्णय घेतले. आदिवासींचा विकास करण्याची क्षमता फक्त भारतीय जनता पार्टीत असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे झालेल्या जाहीर सभेत केली.
नवापूर मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
देशातील सर्वाधिक विकसीत अशा ११५ जिल्ह्यांच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विशेष कार्यक्रम तयार केला. या कार्यक्रमावर पंतप्रधान मोदी स्वतः लक्ष ठेवून आहेत. या ११५ जिल्ह्यांत नंदूरबार जिल्ह्याचाही समावेश आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नंदुरबार जिल्ह्याचे पालक बनून विकासाच्या कामांना गती देणार आहेत. आदिवासी समाजातील लढवय्यांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपुर्ण योगदान दिले. मात्र अनेक वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने या वीरांची दखल घेतली नाही. मात्र मोदी सरकारने या स्वातंत्र्यसेनानींच्या स्मरणार्थ त्यांची स्मारके बांधण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशाची सुरक्षा विचारात घेऊन कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला. ३७० व्या कलमामुळे काश्मीरचा विकास खुंटला होता, काश्मीरमध्ये दहशतवाद फोफावला होता. हे कलम रद्द करण्याच्या मागणीकडे काँग्रेसने सातत्याने दुर्लक्ष केले. मात्र मोदी सरकारने सत्तेची पर्वा न करता घटनेतील कलम 370 हटवले आणि काश्मीरी जनतेला न्याय मिळवून देण्याची हिंमत दाखवल्याचे ते म्हणाले.
कलम 370 चा आणि महाराष्ट्राचा संबंध काय असा प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील वीर जवानांनी देशाच्या सीमेच्या रक्षणेसाठी काश्मीरमध्ये आपल्या प्राणांची आहुती दिल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गोरगरीबांच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. या निर्णयांचा फायदा नंदुरबार जिल्ह्यातील गोरगरीब आदिवासी जनतेला झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात १ लाख ६७ हजार मोफत शौचालये बांधण्यात आली आहेत, नंदुरबार जिल्ह्यातील २ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेचा फायदा झाला आहे. २६ हजार जणांना घरे बांधून देण्यात आली, १ लाख ५० हजार महिलांना उज्जवला योजनेखाली मोफत गॅस सिलेंडर चे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाने घेतली लोकसभा निवडणूकीच्या कामकाजाची माहिती

इंडोनेशिया देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *