Breaking News

अशोक चव्हाण यांचा सवाल, अहमदाबादसाठी १८ विमाने; राज्यांतर्गत फक्त १५ का? महाराष्ट्रातील विमानसेवांवर अशोक चव्हाण यांचा सवाल

मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी रोज १८ विमानसेवा उपलब्ध आहेत. मात्र, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात प्रवास करण्यासाठी सर्व मिळून जेमतेम १५ विमानसेवा का? असा सवाल काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला.
राज्यातील विमानतळांची दूरवस्था आणि विमानसेवेबाबत त्यांनी आज विधानसभेत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी लक्षवेधी मांडली. या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध विमानतळांचे प्रश्न व प्रवाशांच्या अडचणी त्यांनी राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या.

याबाबत पत्रकारांना माहिती देताना अशोक चव्हाण म्हणाले की, राज्यात जेमतेम ११ विमानतळे वापरण्यायोग्य असून, त्यांपैकी अनेक विमानतळांवर नियमित विमानसेवा ठप्प आहे. याबाबत मी केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला. त्यांचा प्रतिसाद सकारात्मक राहिला असून, ‘उडाण’ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील विविध विमानसेवा सुरू करण्यासाठी अनेक विमान कंपन्यांनी बोली लावली. मात्र, अनेक प्रमुख शहरातील विमानतळेच बंद असतील तर विमानसेवा कशी सुरू होणार? महाराष्ट्राच्या सर्व विभागात किमान एक-दोन शहरात तरी विमानसेवा सुरू असायला हवी. नांदेडसह राज्यातील अनेक विमानतळांचे संचालन करणारी रिलायन्स कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने नांदेड टर्मिनलवर साधा झाडू मारायला कोणी नाही, धावपट्ट्या खराब होत आहेत, नाईटलँडिंग बंद पडली आहे, डीजीसीएसारख्या संबंधित यंत्रणांना देय असलेले शुल्क देखील रिलायन्सकडे थकित झाल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

अहमदाबादसारखे स्वस्त प्रवासभाडे महाराष्ट्रात का नाही?
यावेळी अशोक चव्हाण यांनी अहमदाबादप्रमाणेच महाराष्ट्रातल्या अंतर्गत विमानसेवेचे प्रवासभाडे स्वस्त का नाही? असा प्रश्न उपस्थित केला. याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, मुंबईहून अहमदाबादसाठी १ हजार ९९१ रूपये इतक्या स्वस्त दरात विमानाचे तिकीट उपलब्ध होते. मात्र त्यापेक्षा कमी अंतर व प्रवासाचा कमी कालावधी असलेल्या औरंगाबादचे सर्वात स्वस्त भाडे ३ हजार ८४ रूपये तर कसे, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. अंतर व प्रवासाचा कालावधी जवळपास सारखेच असलेल्या नागपूरचे विमान तिकीट किमान ३ हजार ४०८ रूपये आहे, अशीही माहिती दिली.

नांदेड विमानतळाची थकबाकी राज्य सरकार भरणार- फडणवीस
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड विमानतळाचे संचालन करणाऱ्या रिलायन्सची थकबाकी राज्य सरकार भरेल व त्यानंतर ती त्यांच्याकडून वसूल केली जाईल, अशी घोषणा केली. विमानतळांचा विकास व संचालन सुकर करण्यासाठी स्वतंत्र नोडल एजन्सी तयार करण्याची चव्हाण यांची मागणीही त्यांनी मान्य केली. मुंबईला उतरण्यासाठी सकाळच्या सत्रात स्लॉट मिळत नाही. मात्र, पुढील वर्षी नवी मुंबईचे विमानतळ सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील विविध शहरांमधून येणाऱ्या विमानांसाठी स्लॉटची अडचण राहणार नाही, असे आश्वासनही दिले.

Check Also

निर्मला सीतारामन यांची सॅम पित्रोदांच्या वर्णद्वेषी टिप्पणीवरून टीका

आंतरराष्ट्रीय ख्यातकिर्त विचारवंत शास्त्रज्ञ आणि काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी आज एक व्हिडिओ जारी करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *