Breaking News

१२ वीच्या परिक्षेला १४ लाख ५७ हजार विद्यार्थीः ३ हजार केंद्र सज्ज बारावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता १२ वी च्या लेखी परीक्षांना उद्या मंगळवार २१ फेब्रुवारी पासून सुरूवात होत आहे. परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शासन विविध उपाययोजना करीत असून विद्यार्थ्यांनी तणावमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात, असे आवाहन करून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये इयत्ता १२ वी साठी एकूण तीन हजार १९५ केंद्रांवर १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी परीक्षा देणार असून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण तीन लाख २१ हजार ३९६ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करता यावी यासाठी मंडळामार्फत सप्टेंबर महिन्यात संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले, तर परीक्षेचे अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यात येऊन प्रवेशपत्र देखील ऑनलाईन पद्धतीने वितरीत करण्यात आले.

‘कोविड’च्या प्रादुर्भावानंतर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून परीक्षा निकोप पार पडाव्यात, विद्यार्थ्यांचे परीक्षांबाबत दूरध्वनीद्वारे शंका समाधान व्हावे यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विभागीय मंडळस्तरावर नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सवलती देण्यात येत असून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.

परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाची मदत घेतली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन मंत्री केसरकर यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

Check Also

इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाने घेतली लोकसभा निवडणूकीच्या कामकाजाची माहिती

इंडोनेशिया देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *