Breaking News

अखेर सोलापूर विद्यापीठाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर‘ यांचे नाव उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थिती लिंगायत आणि धनगर समजाची साम्यंजसाची

मुंबई : प्रतिनिधी

सोलापूर विद्यापीठाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर‘ यांचे नाव देण्यावरून सोलापूर जिल्ह्यात लिंगायत समाज आणि धनगर समाज आमने-सामने आला. तसेच विद्यापीठाला नाव देण्यावरून आणि न देण्यावरून या दोन्ही समाजाच्या नागरीकांनी धरणे आणि मोर्चे काढले. मात्र अखेर अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून ३१ मे २०१८ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात नामविस्तार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. विशेष म्हणजे लिंगायत समाजानेही विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव दिले तर सोलापूरात नव्याने होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळास महात्मा बसवेश्वर यांचे नाव द्यावे अशी मागणी उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे आज झालेल्या चर्चे दरम्यान केली. त्यास मंत्री तावडे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

मंत्रालयात आज शिवा संघटनेच्यावतीने विरशैव लिंगायत समाजाचे प्रतिनिधी आणि धनगर समाजाचे प्रतिनिधीसमवेत त्यांच्या समाजाच्या मागण्यांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस धनगर समाज विकास परिषदेचे अध्यक्ष गणेश हाके, राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतले, यशवंत उद्योजकचे अध्यक्ष ललित बंडगर, शिवा महिला आघाडीच्या अध्यक्ष वैशाली लाठे, शिवा संघटनेचे अध्यक्ष शिवा बिराजदार आदिसह समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी सामंजस्याने समाजाच्या हिताचा निर्णय घेतल्याने तावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार उपसमिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय घेण्यात आला असल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले.

तसेच, सोलापूर विमानतळास महात्मा बसवेश्वर विमानतळ असे नाव देण्याचा निर्णय आणि सोलापूर रेल्वे स्टेशनला श्री सिद्धेश्वर रेल्वे टर्मिनस असे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासन रेल्वे प्रशासनास पाठविणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

सोलापूर येथे महात्मा बसवेश्वर यांच्या भव्य राष्ट्रीय स्मारकाची घोषणा झाली असून, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून पुढील कार्यवाहीबाबत अंमलबजावणी करण्यात येईल.

याचबरोबर वीर शैव लिंगायत समाजातील तरूण तरूणींना उद्योग सुरू करण्यासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून महामंडळास दरवर्षी १० कोटी रूपये देणे. अभ्यासक्रमामध्ये बसवेश्वर यांच्या माहितीचा समावेश करणे, विविध विद्यापीठात श्री बसवेश्वर अध्यासन केंद्र स्थापन करण्यात यावे जेणेकरून तेथे श्री बसवेश्वर यांची माहिती देणारे व्याख्यान आयोजित करण्यात येतील. महात्मा बसवेश्वर जयंतीला महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार व्यक्ती व संस्था यांना विशेष कार्यासाठी देण्यात यावा. असे निर्णय घेण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र वीरशैव- लिंगायत बोर्ड कायद्याने स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी शेवटी दिले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *