Breaking News

संजय राऊत म्हणाले, अशी पत्रे शिवसेना भवनात शेकड्याने येतात मात्र… त्या पत्रावरून मनसेवर साधला निशाणा

काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना धमकीचं पत्र आल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेवून राज ठाकरे यांना सुरक्षा पुरविण्याची मागणी केली. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणा की, अशी पत्रे शिवसेना भवनात आम्हाला रोज शेकड्याने येत असतात असा खोचक टोला लगावत महाराष्ट्र सुरक्षित असून कोणाच्याही केसाला धक्का लागणार नसल्याचे सांगत अप्रत्यक्ष मनसे प्रमुख राज ठाकरेंना सुरक्षा मिळणार नसल्याचे व्यक्त केले.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते.
कोणी कोणाला हात लावत नाही. अशी पत्रे शिवसेना भवनात आम्हाला रोज शेकड्याने येत असतात. महाराष्ट्र सुरक्षित आहे. महाराष्ट्रात कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही. जर कोणाच्या केसाला धक्का लागला तर केंद्र सरकार त्यांची सीआयएसएफची सुरक्षा द्यायला समर्थ असल्याचा खोचक टोलाही मनसेचे नाव न घेता त्यांनी लगावला.
राज ठाकरे इतक्या वर्षांपासून महाराष्ट्रात राहतात. ते ठाकरे आहेत. महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय नेत्याला हात लावण्याची कोणाचीही हिंमत नाही. महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे. ही स्टंटबाजी सोडून द्यावी. महाराष्ट्राच्या कोणत्याही नागरिकाला धोका असेल तर येथील गृहमंत्री, गुप्तचर यंत्रणा आणि सरकार त्यांच्या सुरक्षेसाठी जबाबदार आहेत. ते त्यांची पूर्ण रक्षा करतील असेही त्यांनी सांगितले.
अयोध्येच्या आंदोलनात दोन्ही बाजूने हजारो लोकांनी प्राण गमावले आहेत. रक्ताच्या नद्या वाहिल्या आहेत. त्यानंतर आता राम मंदिर उभं राहत आहे. राम मंदिर आमच्या सर्वांच्या अस्मितेचा विषय होता. ते उभं राहत आहे. त्यामुळे आता देशात महागाई, बेरोजगारी, राष्ट्रीय सुरक्षा या विषयाकडे पाहणं गरजेचं असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, या देशाचा रुपया ७७ रुपये प्रति डॉलर इतका खाली घसरला आहे. इतिहासात रुपया इतका खाली घसरला नव्हता. देशाची अर्थव्यवस्था कोसळली आहे. लोकांना नोकऱ्या नाहीत, महागाईशी सामना करता येत नाही. राज्यकर्ते आणि सर्व पक्षांनी यावर बोलणं गरजेचं असल्याचेही ते म्हणाले.
काही काळ वादग्रस्त विषय दूर ठेवलं पाहिजे. नाहीतर श्रीलंकेत जी स्थिती आहे तशी भारतात येईल. श्रीलंकेत जसं राज्यकर्त्यांना रस्त्यावर धरून बदडलं, राष्ट्रपती, पंतप्रधान पळून गेलेत, त्यांच्या घरांना आगी लावल्या आहेत ही परिस्थिती येऊ नये असं वाटत असेल तर राज्यकर्ते आणि राजकारण्यांनी लोकांच्या प्रश्नावर बोलावं असेही ते यावेळी म्हणाले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *