Breaking News

उत्पल पर्रिकरांना शिवसेनेचा पाठिंबा; भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम

गोवा विधानसभा निवडणूकीसाठी जर स्व.मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर निवडणूकीला उभे रहात असतील तर त्यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याची घोषणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यानुसार उत्पल पर्रिकर यांनी आपला पणजीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शिवसेनेने पणजीतून दिलेला उमेदवार मागे घेत आपला पाठिंबा पर्रिकर यांना जाहीर केला. विशेष म्हणजे उत्पल पर्रिकर यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूकीला उभारण्याच्यादृष्टीने हालचाली सुरु केल्या होत्या. तर दुसऱ्याबाजूला संजय राऊत यांनी महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री होणार नसल्याचा इशारा देत भाजपाला दिला.

शिवसेनेचे पणजी मतदारसंघातील उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी याबद्दल माहिती दिली.

आम्ही आमचा शब्द पाळत आहोत. शिवसेनेचे शैलेंद्र वेलिंगकर यांनी पणजीमधून उमेदवारी मागे घेतली आहे. इतकेच नाही तर आमचे कार्यकर्ते उत्पल पर्रीकर यांना पूर्ण पाठिंबा देतील. पणजीची लढाई ही केवळ निवडणुकीपुरती आहे. पण हे गोव्याच्या राजकारणाचे शुद्धीकरणही आहे असे मतही त्यांनी यावेळी ट्विटवरून व्यक्त केले.

संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये आदित्य ठाकरेना टॅग करत उत्पल पर्रीकर यांचा कोट असलेला एक फोटो आपल्या ट्विटमध्ये शेअर केला. “तुम्ही दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या मतदारसंघात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला तिकीट द्याल?”. भाजपाने बाबुश म्हणून ओळखले जाणारे अटानासियो मोन्सेरेट यांना पणजीतून उमेदवारी दिल्यानंतर उत्पल पर्रिकरांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याच अनुषंगाने हे गोव्याच्या राजकारणाचे शुद्धीकरण असल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले.

मला माझ्या वडिलांचं काम पुढे न्यायचं आहे. मी पणजीतल्या लोकांसाठी २०० टक्के देऊन काम करीन. ते मला पाठिंबा देतील याची मला खात्री आहे. निवडणूक जिंकण्याविषयीच्या विश्वासाबद्दल विचारणा केली असता पर्रिकर म्हणाले, पणजीच्या लोकांचा मला पाठिंबा आहे. पणजीच्या भविष्यासाठी ते मला नक्कीच मतं देतील अशी आशा उत्पल पर्रिकर यांनी एका वृत्त एजन्सीशी बोलताना दिली.

उत्पल यांना भाजपाने अन्य दोन मतदारसंघांचे पर्याय दिले होते़. मात्र, त्यांना ते अमान्य होते. त्यामुळे त्यांनी बंड करत अपक्ष लढण्याचा पर्याय निवडला होता.

महाराष्ट्रात पुढील २५-३० वर्ष तरी भाजपाची सत्ता येणार नाही. त्यामुळे काही झालं तरी महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही असे भाकित शिवसेना खासदार संजय राऊत करत जे वैफल्यग्रस्त असतात, निराश मनाने राजकारण करतात त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशाच असते. त्यांचा जागतिक स्तरावरचा पक्ष आहे. उद्या ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल असं ते सांगू शकतात. पण काही झालं तरी महाराष्ट्रात त्यांचा मुख्यमंत्री होणार नसल्याचेही ते म्हणाले.

युतीची कसलीही चर्चा नाही. कुणाशीही चर्चा नाही. दबके आवाज वैगैरे असे काही नसतं. आमच्याकडून कोणी परस्पर काही बोलत असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. तो मूर्खपणा आहे. शिवसेना-भाजपा युतीत आम्ही थोडंफार नाही तर २५ वर्ष एकत्र होतो, नांदलो ते नातं भाजपच्या आडमुठेपणामुळे संपलं आहे. वैफल्यग्रस्त, निराश मनाने राजकारण करणारे असतात, त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशा असते अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी भाजपावर केली.

स्थानिक पातळीवर स्थानिक राजकारण्यांच्या नावाखाली काही भ्रष्ट हातमिळवणी होत असतात. आमची भाजपासोबत युती असतानाही आमच्या काही लोकांनी केल्या होत्या. आता अशी मनमानी चालणार नाही. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. आम्ही दक्षता घेत असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनेही घ्यावी. जास्तीत जास्त आपले नगराध्यक्ष निवडून यावेत यासाठी सर्वांनी काम करावं असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

Check Also

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना ४८ तास प्रचार करण्यास बंदी

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती (BRS) प्रमुख के चंद्रशेखर राव यांना लोकसभा निवडणुकीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *