Breaking News

महाराष्ट्रातल्या नद्यांमध्ये प्रेत फेकली नाहीत सुप्रिया सुळे, नवाब मलिक, नाना पटोलेनंतर संजय राऊतांची टीका

मराठी ई-बातम्या टीम

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी केलेल्या अभिभाषणावरील चर्चेच्या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना प्रसारास महाराष्ट्र काँग्रेसला जबाबदार धरले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अन्य नेत्यांनी टीकेची झोड उठविल्यानंतर आज शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधानांच्या आरोपाला उत्तर देताना म्हणाले की, महाराष्ट्राला सुपर स्प्रेडर म्हणालात पण आमच्या नद्यांमध्ये बेवारस प्रेत फेकली नसल्याचा उपरोधिक टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मोदींच्या या टीकेला उत्तर दिले होते. त्या म्हणाल्या होत्या, कोविडच्या काळात लोकांनी एकमेकांना धावून – धावून मदत केली. मला कोरोना काळात एक फोटो कुणी तरी पाठवला होता. एक महिला तिच्या मागे बॅग होती. त्यावर मूल झोपलं होतं. वडील बॅग ओढत होते. खाली एक टॅग लाईन होती. तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूँ मै, मला पंतप्रधानांना तोच सवाल करायचा आहे. माननीय पंतप्रधानजी तुमसे नाराज नही हूँ. हैरान हूँ मै आपसे. आम्ही सुपर सप्रेड आहोत, असं कसं बोललात, असा सवाल केला होता.

सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेच्या पुढे जावून शिवसेना खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंगा नदीत कोरोनाबाधितांची मृतदेह सोडण्यात आल्याच्या घटनेचा उल्लेख अप्रत्यक्ष करत पंतप्रधान मोदींसह भाजपाला चांगलेच अडचणीत आणले.

कितीही प्रयत्न करा. खोटे पुरावे उभे करा, लोकांना धमकावा, सरकार पाडण्याच्या धमक्या द्या, पण शिवसेना आणि महाराष्ट्र हा अशा येड्यागबाळ्यांपुढे झुकणारा नाही. महाराष्ट्राचा बाणा आहे. कुणाला गुडघे टेकायचे असतील, कुणाला महाराष्ट्राची लाज काढायची असेल, महाराष्ट्राला सुपर स्प्रेडर कोरोना म्हणालात. महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये, समुद्रामध्ये बेवारस प्रेतं फेकली नाहीत आणि महाराष्ट्रात सुपर स्प्रेडर…? हे योग्य नाही.. ईडीच्या दबावापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार नसल्याचे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

त्याचबरोबर संसदेत एखाद्याने किती खोटं बोलावं यालाही काही सीमा असून जी घटना घडलीच नाही ती घडल्याचे वक्तव्य केले. किमान लोकशाहीच्या मंदिरात तरी पंतप्रधानांनी खोटं बोलणं टाळायला हवे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *