Breaking News

विनायक राऊत यांचा आरोप, त्यांचे पत्र येण्याआधीच लोकसभा सचिवांकडून शेवाळेंची नियुक्ती लोकसभा सचिवांकडून आमच्यावर अन्याय नैसर्गिक न्याय नाकारला

दोन दिवसांपूर्वी आमदारांपाठोपाठ शिवसेनेच्या १२ खासदारांनीही शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी लोकसभेतील गटनेते आणि पक्षप्रतोद बदलण्यात आल्याचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून दिले. मात्र शिंदे गटाकडून हे पत्र देण्याआधीच लोकसभा सचिवांकडून दोन दिवस आधीच जारी करण्यात आलेल्या पत्रात राहुल शेवाळे यांची गटनेते पदी निवड करण्यात आल्याचे जारी करत मूळ शिवसेनेवर अन्याय केल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील उध्दव ठाकरे गटाचे गटनेते खासदार विनायक राऊत यांनी केला.

नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत विनायक राऊत यांनी हा आरोप केला. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना ६ जुलै आणि १८ जुलै रोजी दिलेल्या पत्राच्या प्रतीही दाखविल्या.

आम्ही ६ जुलैलाच लोकसभा अध्यक्ष आणि संसदीय कामकाज मंत्र्यांना पत्र दिलं होतं. त्यानंतर १८ जुलैला रात्री साडेआठ वाजता लोकसभा अध्यक्षांच्या घरी जाऊन शिवसेनेच्या गटनेतेपदावर कुणी दावा केल्यास आम्हाला आमचं म्हणणं मांडण्याची संधी द्या अशी मागणी केली. पुन्हा १९ जुलैला समक्ष भेटून लोकसभा अध्यक्षांना त्याबाबत पत्र दिलं. मात्र, त्यांनी आमच्या पत्रांची दखल न घेता अचानक लोकसभेतील शिवसेना गटनेते बदलले आहेत. राहुल शेवाळे यांचं नाव लोकसभा संकेतस्थळावर दाखवलं जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसभा संकेतस्थळावर २० जुलैला पत्र आलं. आमच्या हातात आलं १९ जुलैला, परंतु प्रत्यक्षात लोकसभेतील गटनेत्यांची यादी १८ जुलैची आहे. माझ्या माहितीनुसार एकनाथ शिंदे गटाचे खासदार लोकसभा अध्यक्षांना १९ जुलैला भेटले आणि पत्र दिलं. असं असताना लोकसभा अध्यक्षांनी अगोदरच १८ जुलैलाच हा निर्णय घेऊ ठेवला होता. लोकसभा सचिवालयाने १९ जुलैला पत्र काढलं आणि हा निर्णय १८ जुलैपासून लागू असल्याचं म्हटलंय, असेही त्यांनी सांगितले.

लोकसभा सचिवालयाचं हे कृत्य कोणत्या नियमाला धरून आहे याचं आम्हाला आकलन झालेलं नाही. त्यांना कोणताही नैसर्गिक न्याय न देता, आमच्या पत्राची दखल न घेता बंडखोर गटाचा गटनेता बनवायचाच होता. त्यांनी किमान ज्या दिवशी बंडखोरांनी पत्र दिलं त्या दिवसापासून तरी अंमलबजावणी करायला हवी होती. परंतु त्यांनी पत्र १९ जुलैला दिलं आणि अंमलबजावणी १८ जुलैलाच केली. त्यामुळे पक्षपाती निर्णय झाल्याची भावना शिवसेना खासदारांमध्ये असल्याचेही ते म्हणाले.

आम्ही त्यांच्या आधी पत्र देवूनही त्यांनी दाखल केलेल्या पत्रावर आम्हाला न विचारताच निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा सचिवांकडून आम्हाला नैसर्गिक निर्णय नाकारण्यात आल्याचे दिसून येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील २८२ पैकी १८८ सदस्य आमच्याकडे असल्याचा दावा केला. यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांना विचारलं असता त्यांनी हा दावा फेटाळत म्हणाले, एकनाथ शिंदे गटाचा दावा खोटा आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील १०० टक्के सदस्य पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंसोबत आहेत असेही ते म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *