Breaking News

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करू नका राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांची मागणी : विरोधकांचा सभात्याग

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक बांधले जाणार आहे. त्याच्या निविदा ही आता निघाल्या आहेत. मात्र आम्ही सरकारमध्ये असताना जगात सर्वात उंच पुतळा या स्मारकात बांधण्याचा निर्णय घेतला होता. पण आताच्या सरकारने पुतळ्याची उंची ११२ फुटाने कमी केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. तसेच पुतळ्याची उंची कमी करण्याचे काम राज्यातील जनता कधीही सहन करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

विधानसभेत राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीचा मुद्दा स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून उपस्थित केला. तसेच याविषयावर सर्व कामकाज थांबवून चर्चा घेण्याची मागणी केली. त्यावरील चर्चेत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आदींनी मते व्यक्त केली.

आघाडी सरकारच्या काळात जे डिझाइन फायनल केले होते. त्यात या सरकारने बदल केले आणि महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली. हे काही योग्य नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन हे लोक सत्तेत आले त्यांच्याच पुतळ्याची उंची कमी करणे हे जनता सहन करणार नाही. छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी करू नका अशी मागणीही त्यांनी केली.

मात्र अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर उत्तर देताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त तुमचेच आहेत. त्यांच्या बद्दल आमच्याही मनात मोठ्या प्रमाणावर आदर आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या पुतळ्याची उंची कमी करणार नसल्याचे आश्वासन देत आघाडी सरकारच्या काळात या स्मारकाबद्दल कोणतीच कारवाई झाली नसल्याबद्दल माफी मागत असल्याचे जाहीर केले.

त्यामुळे विरोधकांनी मुनगंटीवारांच्या उत्तराचा निषेध करत एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यातच राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार म्हणाले की,  या सरकारचं काय सुरू आहे ? सरकार असं का वागत आहे. छत्रपती हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांचा असा अपमान सहन केला जाणार नसल्याचा इशारा दिला.

अजित पवार यांच्या भाषणानंतर सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जुनं काही काढत बसू नका असे सांगत हा स्थगन प्रस्ताव नाकारत असल्याचे जाहीर केले. मात्र उद्या या मुद्यावर ३९४ अन्वये चर्चेचा प्रस्ताव टाका आणि दिवसभर चर्चा करावी अशी सूचना केली.

अध्यक्षांनी आदेश देवूनही पुन्हा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार या विषयावर चर्चा करायला तयार असल्याचे सांगत तुम्ही प्रस्ताव द्या असे प्रति आव्हान विरोधकांना दिले. त्यावर विरोधी पक्षांनी याप्रश्नी आताच चर्चा करण्याची मागणी केली. मात्र अध्यक्ष बागडे यांनी यावर उद्या चर्चा करू असे सांगत तात्काळ चर्चेची मागणी नाकारली. त्यामुळे अखेर सरकारच्या भूमिकेचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला.

 

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *