Breaking News

संभाजी भिडेला वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या धमक्यांचा सरकारकडूनच बनाव ? गृह विभागाला सांगून खोटा अहवाल बनविल्याची दबक्या आवाजात मंत्रालयात चर्चा

मुंबई : प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगांव येथे दलितांच्या विरोधात झालेल्या हिंसाचारात नक्षलवादी गुंतल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला. मात्र या हिंसाचाराच्या मागील असलेला प्रमुख संशयित आरोपी संभाजी भिडेला अटक करण्याऐवजी त्याना वाचविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या गृह विभागाला सांगून नक्षलवाद्यांकडून मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना धमक्याचा खोटा बनाव तयार करण्याचे आदेश मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्याने दिल्याची माहिती गृह विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

१ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगांव येथे झालेल्या हिंसाचाराच्या मागे सुरुवातीला काही राजकिय पक्षांची तर काही संघटनांची नावे घेण्यात येत होती. तश्या पध्दतीचा अहवाल गृह विभागाच्या अखत्यारीत असलेल्या विशेष शाखेकडून तयार करण्यात आला. त्या अहवालात पहिल्यांदा काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांची नावांचा उल्लेख करण्यात आला. परंतु त्याचा राजकिय फायदा काँग्रेसला होईल या भीतीने पुन्हा हा अहवालात बदल करत यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांवर दोषारोप ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र याचे राजकिय उलटे परिणाम घडू शकतात अशी शक्यता दिसून आल्याने हा अहवाल पुन्हा बदलण्यात आला. शेवटी या हिंसाचारात नक्षलवादी सहभागी झाल्याचे ठरविण्यात आले. तसेच पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेतही नक्षलवादी सहभागी झाल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी विविध आंबेडकरी संघटनांनी मोर्चे काढत सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनाही अटक करण्यात राज्य सरकारकडून टाळाटाळ करण्यात आली. आता त्याचा जोर ओसरताच भिमा कोरेगांव प्रकरणी नक्षलवादीच जबाबदार असल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी सुधीर ढवळे यांच्यासह काही जणांना अटक करण्यात आली. त्याचबरोबर या प्रकरणाचे गांभीर्य वाढावे यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना धमक्यांची पत्रे जारी करण्यात आल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्याशी काल दिवसभर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *