Breaking News

गोव्यात राष्ट्रवादीची शिवसेनेसोबत युती तर मुंबई एकला चलो रे? गोव्यात राष्ट्रवादीचे १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; नवाब मलिक ९ फेब्रुवारीपासून निवडणूक प्रचारात...

मराठी ई-बातम्या टीम
गोव्यामध्ये राष्ट्रवादीचे १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून प्रचारासाठी ९ ते १२ फेब्रुवारीपर्यंत गोव्यात राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. गोवा विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेबरोबर युती असली तरी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकला चलो रे संकेत दिले.

गोव्यातील विधानसभा निवडणुकीतील स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. ९ फेब्रुवारीला कॅबिनेट संपल्यावर गोव्याला प्रचारासाठी जाणार आहे व १२ तारखेपर्यंत तिथे प्रचार करणार असल्याचे सांगतानाच इतर नेत्यांचे कार्यक्रम जाहीर झाल्यावर कळवण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गोव्यात मनोहर पर्रीकर यांनी भाजपला उभारी दिली. मात्र वारंवार भाजपा नेते ज्यांच्यावर आरोप करत होते त्यांनाच दोन – दोन जागा देण्यात आल्या. म्हणजे मूळ भाजपा लोकांचे तिकीट नाकारता येते हे भाजपानेच स्पष्ट केले. पणजी मतदारसंघात उत्पल पर्रीकर यांना जनतेचा जोरदार पाठिंबा मिळत असून आमच्या पक्षाचा त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका गोव्याचे अध्यक्ष घेतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईत स्वबळावर लढायचं तर लढून जास्त जागा कशा निवडून आणण्याबाबत बैठकीत चर्चा – नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण मुंबईत लढणार नाही. परंतु सर्वांनी ठरवलं आम्हाला स्वबळावर लढायचं आहे तर मर्यादित जागांवर लढून जास्त जागा कशा निवडून आणता येईल याबाबत कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले

आज प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई जिल्हाध्यक्ष व प्रभारी आणि नगरसेवकांची बैठक नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मुंबई महानगरपालिकेची फेररचना झाल्यानंतर आज ही बैठक झाली. या बैठकीला सहा जिल्हाध्यक्ष, प्रभारी आणि सहा नगरसेवक उपस्थित होते.
या बैठकीत फेररचना झाल्यानंतर जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांच्या वार्डाची परिस्थिती काय आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात कुठल्या – कुठल्या जागेवर स्वबळावर लढू शकतो याचा अंदाज घेण्यात आला. त्यानंतर १४ फेब्रुवारीला विधानसभानिहाय बैठका घेऊन त्यामध्ये अंदाज घेतला जाईल व इतर पक्षांसोबत बोलणी करुन अंतिम निर्णय वरिष्ठ घेतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *