Breaking News

परमवीर सिंगांची वक्तव्ये राजकारणाने प्रेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मराठी ई-बातम्या टीम

परमवीरसिंग यांची वक्तव्ये ही राजकारणाने प्रेरीत असून अँटिलिया बॉम्ब प्लांटचा मुख्य सुत्रधार परमवीरसिंगच आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.
अँटिलिया बॉम्ब प्लांटनंतर मनसुख हिरेनची हत्या करण्यात आली. एटीएस या प्रकरणाचा तपास करत असताना अजून सत्य बाहेर येणार होते, त्याचवेळी एनआयएने तपास हाती घेतला. त्याचवेळी परमवीरसिंग यांच्या घरी बैठक झाली याचा उल्लेख आहे कुरकुरे बालाजी यांच्या ईमेलचा उल्लेख आहे. इलेक्ट्रॉनिक पुरावे तयार करण्यासाठी पाच लाख रुपये देण्यात आले याचाही उल्लेख आहे. असे असताना अॅडिशनल चार्जशीट दाखल करणार असल्याचे सांगूनही एनआयएने चार्जशीट दाखल केली नाही याचा अर्थ केंद्र सरकार परमवीरसिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
परमवीरसिंग यांच्या माध्यमातून खोटे आरोप करण्यात येत असून जो मुख्य सुत्रधार आहे त्यांची वक्तव्य राजकारणाने प्रेरीत आहेत. केंद्र सरकार परमवीरसिंग यांच्या माध्यमातून आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी व अडचणीत आणण्यासाठी कट कारस्थान रचत आहे. त्यांचे हे कटकारस्थान कोर्टात उघड होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
एमआयएमचे अध्यक्ष ओवीसी यांच्यावर झालेला हल्ला ही गंभीर बाब आहे. उत्तरप्रदेश सरकारने याबाबतीत कडक पाऊले उचलायला हवीत असे मतही व्यक्त करत नवाब मलिक पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक प्रचाराला येणार्‍या सर्व नेत्यांची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. त्यामुळे तात्काळ उत्तर प्रदेशच्या डीजीपींना आदेश देऊन त्या सर्व येणाऱ्या स्टार प्रचारकांची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारने घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये सातत्याने साक्षीदार फुटत असल्याची बाब समोर येत आहे ही गंभीर बाब असून यानिमित्ताने देशाच्या हितासाठी शहीद होणारे हेमंत करकरे यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. केंद्रातील सरकार बदलल्यानंतर सरकारी वकील आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या लोकांवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे कोर्टाने या सर्व बाबीची दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *