Breaking News

लुंग्यासुंग्याने टिका केली तर मी लक्ष देत नाही पंतप्रधान मोदींना शरद पवारांचा उपरोधिक टोला

अहमदनगर – शेवगांवः प्रतिनिधी
अगोदर गांधी परिवाराला शिव्या घातल्या आता माझा नंबर लागला आहे. बिनपैशाने माझी प्रसिध्दी होतेय. मग मी काय साधासुधा आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतील आहे. त्यामुळे अशा लुंग्यासुंग्याने टिका केली तर मी लक्ष देत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींच्या टिकेचा समाचार घेतला.
शरद पवार यांनी मोदी आणि त्यांचे पाच वर्षातील कारनामे याचा पाढाच वाचला शिवाय राष्ट्रवादीने तरुण पिढीला पुढे आणत देशात आणि राज्यात परिवर्तन घडवण्याचा संकल्प केल्याचे सांगताना या परिवर्तनाला साथ द्या असे आवाहनही शरद पवार यांनी आज शेवगांवच्या जाहीर सभेत केले.
आपल्या देशात पद्मश्री, पद्मभूषण यासारख्या पदव्या सरकारकडून दिल्या जातात. परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला न मागता ‘थकबाकीदार’ ही पदवी मिळते. कर्जबाजारी, थकबाकीदार आणि निसर्गाची अवकृपा यामुळे बळीराजा आत्महत्या करतो आहे. मोठमोठ्या थकबाकीदारांची कर्जे माफ केली जातात. परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत आल्यावर त्याच शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आम्ही देशातील शेतकऱ्यांचे ७० हजार कोटीचे कर्ज माफ केले शिवाय व्याजदरही कमी केला होता. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याच्या जलपूजनाला मोदींनी १८ कोटी रुपये खर्च केले. परंतु शिवाजींच्या नावाने राज्य करणाऱ्या या सरकारने चार वर्षात एक वीटही रचली नाही. गुजरातमध्ये सरदार वल्लभ भाई पटेल यांचा सर्वाधिक उंचीचा पुतळा उभारला. मात्र पुतळ्याला जेवढा खर्च आला नसेल तेवढा खर्च यांच्या जाहिरातीवर व कार्यक्रमावर झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
नरेंद्र मोदी हे ५५ महिन्यात ९२ वेळा परदेशात गेले. त्यांच्या विमानावर जवळ जवळ २ हजार २१ कोटी रुपये खर्च करण्यात आला. परदेशात जमा झालेला काळापैसा आणणार सांगून गरीबांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार असे आश्वासन दिले. परंतु यामुळे काळा पैसा आला नाहीच शिवाय खात्यात १५ लाख रुपये येणार म्हणून कुटुंबात, भावाभावात भांडणे लागली. मात्र पैशाचा अद्याप पर्यंत पत्ता नाही. या गोष्टीमुळे तोंड दाखवायला जागा नसल्याने म्हणून एक हजार आणि पाचशे रुपयांचा नोटा चलनातून बंद केल्या आणि या नोटा आता कागदाची रद्दी झाल्याचे सांगत नोटा बदलून घ्यायला रांगेत उभे केले. यामध्ये ११० लोकांचा रांगेत नोटा बदलून घेण्यासाठी आपला जीव गमवावा लागल्याची टीकाही त्यांनी केली.
दुसर्‍या बाजूला दोन कोटी नोकर्‍या देणार असे सांगितले परंतु बेरोजगारांना नोकर्‍या मिळालेल्या नाहीत. चेकने व्यवहार करण्याचे फर्मान काढले. त्यावेळी आम्ही सरसकट चेकने व्यवहार नको असे सांगितले होते. कोथिंबीरची जुडी विकायला चेकने व्यवहार चालणार आहे का, चेकने केला नाही तर तो काळा पैसा. अहो ज्यांनी टॅक्समधुन पैसा दडवला तर तो काळा पैसा आहे. परंतु जो शेतकरी घामाने पैसा कमवतो तो त्याच्या कष्टाचे पैसे असतात. मोदींनी अनेक स्वप्न दाखवली. परंतु ती पुर्ण केलीच नसल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यात ३४ हजार कोटीची कर्जमाफी करण्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात २५ टक्केही कर्जमाफी करण्यात आलेली नाही. सत्ता आली की भ्रष्टाचार संपवू सांगत होते. परंतु सातबाराचा उतारासुध्दा सरळ मिळतो का, काहीतरी वजन टाकावे लागते की नाही असा थेट सवाल जनतेला केला.
कॉंग्रेसच्या सत्तेत ३५० कोटी रुपयांचे राफेल विमान खरेदी संदर्भात चर्चा झाली. तत्पूर्वी कॉंग्रेसचे सरकार गेले. त्यानंतर आलेल्या मोदी सरकारने दोन वर्ष यावर चर्चा केली. नंतर ही किंमत ७५० कोटीवर आली. मात्र पुन्हा एक वर्ष चर्चा केल्यावर ३५० कोटीचे राफेल विमान १६६० कोटी रुपये झाले. न खाऊंगा न खाने दूंगा असे सांगणार्‍या मोदींनी यामध्ये काय केले. दाल में कुछ काला है हे नक्की आहे असा आरोप करतानाच या खरेदीबाबतची माहिती मागवण्यात आली त्यावेळी गुप्त माहिती आहे सांगता येणार नाही असे सांगण्यात आले. या प्रकरणी काही लोक सुप्रीम कोर्टात गेल्यावर कोर्टाने कागदपत्रे मागविली त्यावेळी ती कागदपत्रे चोरीला गेली असे सांगण्यात आले. शेवटी मिडियामध्ये जोरदार टीका सुरु झाल्यावर ती कागदपत्रे काही लोकांनी बाहेर काढली व फोटोकॉपी करुन छापली असे उत्तर दिले. स्वर्गीय राजीव गांधी यांच्यावर याच भाजपाने बोफोर्समध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून चौकशी लावली होती. परंतु आम्ही राफेलची चौकशी करा सांगत आहोत तर करत नाही. यामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याचा अर्थ यांचा व्यवहार स्वच्छ नसल्याचे त्यांनी सांगितले.
पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने केलेल्या कारावाईत अभिनंदन हा पाकिस्तानात पकडला गेला. त्यानंतर तो सुटूनही आला. परंतु ५६ इंचाची छाती आहे म्हणून सोडवून आणला असे राजकारण सुरु केले. ५६ इंचाची छाती आहे तर कुलभूषण जाधव अडीच वर्षे पाकच्या तुरुंगात का आहे. त्याला का सोडवले नाही. त्यावेळी ५६ इंचाची छाती कुठे गेली असा संतप्त सवाल करतानाच शौर्य कुणी दाखवायचे व श्रेय कुणी घ्यायचं असा टोलाही मोदींना लगावला.
पाकिस्तानकडून २०१४ मध्ये २६७ हल्ले झाले तर २०१५ मध्ये २०८ आणि २०१६ मध्ये २१८ हल्ले झाले. त्यावेळी हमारा एक मारेंगे तो हम दस मारेंगे म्हणणार्‍या मोदींनी पुलवामा वगळता काय कारवाई केली असा सवालही मोदींना केला.
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे नेते आणि माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, उमेदवार संग्राम जगताप, सुषमा अंधारे, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार शेखर घुले पाटील, जनशक्ती विकास आघाडीच्या हर्षदा काकडे, शिवाजीराव काकडे, प्रतापकाका ढाकणे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष करन ससाणे, राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदीक आदींसह महाआघाडीचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *