Breaking News

नरेंद्र मोदी यांचे भाकित, ४ जूनला एकमेकांच्या झिंज्या उपटतील, कपडे फाडतील…

गरीबीची कुचेष्टा आणि गरीबांची फसवणूक करणाऱ्या काँग्रेसने जनतेच्या क्षमतेवर विश्वास ठेवला नाही. त्यांच्या इंडी आघाडीतील पक्षांचा परस्परांवर विश्वास नाही, त्यामुळे आता जनतेनेही काँग्रेस व इंडी आघाडीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत विरोधकांवर घणाघाती हल्ले करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी महायुतीच्या महाविजय संकल्प सभांतून मराठवाडा ढवळून काढला. जनतेने मला प्रेम दिले, माझ्यावर विश्वास टाकला,आणि मला भरभरून आशीर्वाद ही दिले, पुढील काळात देशाचा वेगवान विकास करून मी याची परतफेड करेन, अशी ग्वाहीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

‘महायुती’ चे नांदेडचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर, हिंगोलीचे उमेदवार बाबुराव कदम कोहाळीकर आणि परभणीचे उमेदवार महादेव जानकर (रासप) यांच्या प्रचार सभांमधून मराठवाड्यातील मतदारांशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानातून ‘एनडीए’ च्या विजयाची खात्री अधोरेखित झाल्याचा विश्वासही व्यक्त केला. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सर्वत्र ‘एनडीए’ ला एकतर्फी मतदान झाले असून निवडणुकीआधीच पराभूत मानसिकतेत असलेल्या इंडी आघाडीकडे निवडणूक लढण्याची उमेद नाहीच आणि अनेक मतदारसंघांत उमेदवारही नाहीत, अशी टीका केली.

नांदेड येथील सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण, खा.डॉ. अजित गोपछडे आदी उपस्थित होते. परभणी येथील सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड आदी उपस्थित होते.

नरेंद्र मोदी म्हणाले की, आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठी एकत्र आलेल्या इंडी आघाडीतील नेत्यांचा परस्परांवर विश्वास नाही आणि देशातील जनतेवरही विश्वास नाही. देशातील २५ टक्के मतदारसंघांत या आघाडीचे पक्ष एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. ज्यांचा परस्परांवर विश्वास नाही, त्यांच्यावर देशातील जनतेने विश्वास का ठेवावा, असा सवाल करत, एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या या आघाडीला मतदानाच्या पहिल्या टप्प्यातच मतदारांनी नाकारले असल्याचा दावा केला.

पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, ४ जूनला निवडणुकीच्या निकालानंतर या आघाडीचे नेते एकमेकांच्या झिंज्या उपटतील, कपडे फाडतील असे भाकितही वर्तविले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही मोदी यांनी परखड टीका केली. अमेठीमधून पराभूत झाल्यानंतर राहुल गांधी वायनाडमध्ये आले, पण तेथेही त्यांना पराभव चाखावा लागणार असून वायनाडमधील मतदान पार पडल्यानंतर पळ काढून दुसरा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार आहे, असा इशाराही यावेळी देत ते म्हणाले, ज्या परिवाराच्या भरवशावर काँग्रेस पक्ष चालतो, त्या परिवाराचा स्वतःवरच भरवसा राहिलेला नाही, अशी खोचक टीकाही केली.

नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसचा गरीबांवर विश्वास नाही, त्यांनी विदर्भ मराठवाड्याच्या विकासाचा गळा घोटला, त्यांच्यामुळे शेतकरी, गरीब दुबळा झाला, उद्योग विकासाला खीळ बसली, लाखो तरुणांना घरदार सोडून स्थलांतर करावे लागले. मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात लाखो घरांना नळाचे पाणी मिळू लागले आहे. पीक विम्याची हमी शेतकऱ्यांना मिळाली आहे, किसान सन्मान निधीमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचे ओझे हलके झाले, भरड धान्याला जगभरात प्रतिष्ठा मिळवून दिल्याने मराठवाड्याच्या शेतकऱ्याला मोठे लाभ मिळणार असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका करताना म्हणाले की, काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात केलेल्या प्रत्येक जखमेवर आम्ही इलाज आणि उपचार करू, ही मोदींची गॅरंटी आहे अशी ग्वाही देऊन ,त्यांनी मराठवाडा विकासाकरिता केंद्र व राज्य सरकारांनी केलेल्या कामांची यादीच जनतेसमोर सादर केली. गेल्या पाच वर्षांतील विकास कामे ही तर केवळ सुरुवात आहे, पुढच्या पाच वर्षांत विकासाची कामे अधिक गतिमान होतील, असा दावाही यावेळी केला.

नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, ३७० च्या जाचातून काश्मीरची मुक्तता, तिहेरी तलाक प्रथेतून मुस्लिम महिलांची मुक्तता, देशातील कोट्यवधी महिलांचे लखपती दीदीसारख्या योजनांतून सक्षमीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी ही आमची कामगिरी आहे. म्हणूनच गेल्या दहा वर्षांत सुरू झालेल्या विकास यात्रेला बळ देण्यासाठी ‘एनडीए’ च्या उमेदवारांना विजयी करा. कारण हे उमेदवार निवडून आल्यानंतर मोदींना ताकद देणार असून २०२४ ची निवडणूक केवळ सरकार बनविण्यासाठी होणारी निवडणूक नाही, देशासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी रात्रंदिवस मेहनत करणार असून कोणीही कितीही अडथळे आणले तरी आता माघार नाही, देशातील जनतेच्या डोळ्यातील स्वप्नांची पूर्तता करणे हाच आमचा संकल्प असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *