Breaking News

शरद पवार यांचा इशारा, लोकशाहीसाठी ही निवडणूक महत्त्वाची

सध्या देशाची वाटचाल हुकुमशाही कडे चालू आहे. ही हुकूमशाही आपली लोकशाही उद्धवस्त करेल, त्याला उत्तर द्यावं लागेल. ही निवडणूक लोकशाही टिकवण्याकरिता महत्त्वाची आहे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दिला.

महाविकास आघाडीकडून जालना लोकसभेसाठी डॉ. कल्याण काळे आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. महाविकास आघाडीची सभा श्रीहरी पॅव्हेलियन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेला संबोधित करताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, इंडिया आघाडीस अनेक पक्ष साथ देत आहेत. आम्ही सर्व पक्ष मिळून या लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहोत. देशात लोकांना बदल पाहिजे, असं लक्षात येतंय. त्यामुळेच छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) चंद्रकांत खैरे आणि जालना लोकसभेसाठी डॉ. कल्याण काळे या दोघांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे, असे आवाहनही यावेळी केले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, मोदी हे देशाचे पंतप्रधान नव्हे तर केवळ भाजपाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्याकडे राष्ट्रीय दृष्टिकोण नाही. तुम्ही देशासाठी काय करणार हे सांगितलं पाहिजे. मात्र ते सतत टीका करण्यात वेळ घालवत आहेत. माजी पंतप्रधान पंडित नेहरुंवर टीका करणाऱ्या पंतप्रधानांची मानसिकता ओळखा. महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र यांना महागाई कमी करता आली नाही, गॅस आणि पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाली अशी टीकाही यावेळी केली.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, इथं येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ऐकत होतो. पंतप्रधान हे देशाचे असतात, मात्र भाषण ऐकल्यावर असे वाटले की ते भाजपाचे पंतप्रधान आहेत त्यांनी राष्ट्रीय दृष्टीकोन ठेवला पाहिजे. त्यांच्याकडून कधी नेहरू, कधी राहुल गांधींवर टीका करणं सुरूच आहे. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात तर तुम्ही काय केलं ते आधी सांगितलं पाहिजे. माझ्या हातात सत्ता द्या ५० दिवसात महागाई कमी करू म्हणाले होते, पण महागाई कमी करण्याऐवजी ती वाढली आहे. जीवनाश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. देशात बेरोजगारांची संख्या वाढल्याचेही यावेळी सांगितले.

देशातील शेतकरी, विद्यार्थ्यांच्या दशेवर बोलताना शरद पवार म्हणाले की, सर्वेक्षणानुसार देशात शाळां महाविद्यालयांतून बाहेर पडणाऱ्या मुलांच्या बेकारीचं प्रमाण ८७ टक्के आहे. आज शेतीला पाणी नाही, जनावरांना चारा नाही. फळबाग योजना आम्ही सुरू केली होती, आज पाणी नसल्यानं त्या फळबागा जळत आहेत. मात्र देशाचे पंतप्रधान, मंत्री ढुंकूनही बघत नाहीत. राजकर्त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही. मग सत्तेचा हे लोक गैरवापर करीत आहेत. देशाचं राजकारण योग्य रस्त्यावर आणायला पाहिजे यासाठी देशपातळीवर आघाडी केली, त्यासाठी पक्ष एकत्र आले असल्याचंही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना शरद पवार म्हणाले की, सध्या देशातील केंद्र सरकार विरोधात विरोधी पक्षातील नेत्यांनी किंवा इतर कोणीही त्यांच्या विरोधात बोलल्यास केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रभावी कार्यक्रम करीत होते. मात्र, केंद्र सरकारवर टीका केली म्हणून त्यांना तुरुंगात टाकल्याचंही यावेळी सांगितले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *