Breaking News

सत्यजीत तांबे यांनी सांगितले कारण, का भरला अपक्ष उमेदवारी अर्ज राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण

महाविकास आघाडीकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसला देण्यात आली. यानंतर काँग्रेसने उमेदवार म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली. यानंतरही सुधीर तांबेंनी आपला अर्ज दाखल केला नाही. दुसरीकडे सत्यजीत तांबेंनी याच मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. यानंतर पत्रकारांनी ‘काँग्रेसने एवढा विश्वास ठेवला होता. काँग्रेसने तुमच्या वडिलांना उमेदवारी जाहीर केली होती. तरी तुम्ही पक्षश्रेष्ठींचा आदेश का धुडकावला? काँग्रेस आणि भाजपाची एकत्र येण्याची काही रणनीती आहे का?’ असा सवाल विचारला. यावर सत्यजीत तांबेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आणि आमची यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. किंबहुना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचीच इच्छा होती की, मी निवडणूक लढवावी. परंतू तांत्रिक कारणामुळे डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, माझी उमेदवारी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आहे.

सर्व पक्षाच्या लोकांनी मला मदत करावी. मी भाजपाच्या नेत्यांना जाऊन भेटणार आहे. तसेच त्यांनी मला मदत करावी अशी विनंती करणार असल्याचेही सत्यजीत तांबे यांनी आवर्जून नमूद केले.

विशेष म्हणजे सत्यजीत तांबे उमेदवारी अर्ज भरताना बाळासाहेब थोरात उपस्थित नव्हते. याबाबत विचारलं असता सत्यजीत तांबे म्हणाले, बाळासाहेब थोरात यांची तब्येत ठीक नाही. म्हणून ते आज उमेदवारी अर्ज भरताना सोबत नव्हते. ते आणि धनंजय मुंडे एकाच रुग्णालयात आहेत. त्यामुळे ते धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी गेले आहेत. ते दोघेही ब्रीचकँडी रुग्णालयात आहेत.

दरम्यान, सुधीर तांबे म्हणाले, सर्वपक्षिय लोक सत्यजीत तांबेंना मदत करतील. कारण त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.

Check Also

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला

सध्या देशभरात सुरु असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन्स मॅनेज करता येऊ शकते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *