Breaking News

उपमुख्यमंत्री पदामुळे खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर शिवसेनेची यादी तयार काँग्रेस राष्ट्रवादीचे एकमेकांकडे बोट

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न होवून आठवडा होत आला आहे. मात्र हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि पहिल्यांदा शपथ घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह ७ मंत्र्यांचे खातेवाटपही होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री पदावरून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली असल्याने मंत्र्यांच्या खात्याचे वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार या दोन्ही गोष्टी रखडल्याची माहिती महाविकास आघाडीतील एका घटक पक्षाच्या नेत्याने दिली.
उपमुख्यमंत्री पद आणि विधानसभा अध्यक्ष पद या दोन्हींची मागणी काँग्रेसने केली होती. त्यावर राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री पद किंवा विधानसभेचे अध्यक्ष पद काँग्रेसला देवू केले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री पद स्वतःकडे ठेवण्याची तयारी ठेवत काँग्रेसकडे विधानसभेचे अध्यक्षपद दिले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरुवातील उपमुख्यमंत्री पदी पक्षाचे उपाध्यक्ष जयंत पाटील किंवा छगन भुजबळ यांची नावे पुढे केली होती. मात्र अचानक या दोघांची नावे मागे घेवून उपमुख्यमंत्री पदासाठी भाजपाच्या नेतृत्वाखालील औट घटकेच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव राष्ट्रवादीकडून पुढे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचा विश्वासघात करत अजित पवार यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पद स्विकारले. त्यामुळे राज्यातील जनतेत अजित पवार यांच्याविरोधात तीव्र नाराजी आहे. त्यातच आता महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांचे नाव पुढे करण्यात आल्याने त्याचा परिणाम सरकारवर आणि सरकारच्या प्रतिमेवर होणार असल्याच्या भीतीने त्यांच्या नावास काँग्रेसने विरोध केल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर उपमुख्यमंत्री पदासह करायचा अन्यथा नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. त्यामुळे संभावित मंत्रिमंडळाचा विस्तार लांबत असून खाते वाटपातही अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता कमीच असल्याचे ते म्हणाले.
यासंदर्भात अंतिम तोडगा काढण्यासाठी काँग्रेस श्रेष्ठी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये लवकरच बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळात समावेश होणाऱ्या संभावित मंत्र्याची यादी शिवसेनेने तयार केल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Check Also

एनजीएसपी पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *