Breaking News

मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर बसत मंत्री सामंत म्हणाले, आरेचे आंदोलन मागे घ्या दही हंडीला मान्यता दिल्याने भारताचे नाव जागतिक पातळीवर

नॅशनल पार्क १२ हजार हेक्टरवर विस्तारलेला आहे. त्यापैकी आरे कॉलनीची जागा १३०० हेक्टर आहे. त्यातल्या ३० हेक्टर जागेवर मेट्रो तीनचे कारशेड होणार असून या जागेच्या तिन्ही बाजूला रस्ते आहेत. मुळात ही जागा डेअरी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची होती. वनविभागाची नव्हती. परंतु, त्याबाबत सुरवातीपासूनच जाणते- अजाणतेपणी संभ्रम निर्माण केला गेला अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली. तसेच युतीचे सरकार मुंबईच्या पर्यावरणाची काळजी घेणार असल्याने आरे कारशेडच्या विरोधातील आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

विशेष म्हणजे शिंदे गटाचे समर्थक उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार प्रताप सरनाईक आणि माजी आमदार किरण पावस्कर यांनी मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमसीए येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आरेच्या कारशेडला आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचा विरोध आहे. यापार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी केलेल्या आवाहन केले.

सामंत म्हणाले, मेट्रो तीन साठी आरे येथील कारशेडच सर्वार्थाने व्यवहार्य असल्याचा तज्ज्ञांचा अहवाल आहे. मुंबईतील १७ लाख प्रवासी या मार्गिकेवर प्रवास करणार आहेत. ही मेट्रो सुरू झाल्यानंतर रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होणार तसेच कोळसा किंवा तत्सम फॉसिल फ्यूअल त्यासाठी जाळले जाणार नाही. यामुळे, दोन लाख मेट्रीक टन प्रदूषण कमी होणार आहे. ही मेट्रो पर्यावरणपूरकच आहे. कारशेडमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा या मेट्रोमुळे मुंबईतील पर्यावरणाचे संवर्धन करण्यास हातभार लागणार आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी त्यामुळे दूर होईल. लोकांना सुरक्षित, सुखकर आणि वेगवान प्रवासाचे साधन उपलब्ध होईल. त्यामुळे पर्यावरण प्रेमींना माझे आवाहन आहे की त्यांनी आपला विरोध मागे घेत कारशेडचा मार्ग प्रशस्त करावा. कारशेडचे काम आम्ही अत्यंत संवेदनशीलपणे पूर्ण करू. कारशेड कार्यान्वीत झाल्यानंतरच सभोवतालच्या पर्यावरणावर त्यामुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही याचीही काळजी युती सरकार घेईल, असे आश्वासन दिले.

दही हंडीला मान्यता दिल्याने भारताचे नाव जागतिक पातळीवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत काम करीत आहे. दहीहंडी हा हिंदूंचा पारंपरिक सण असून यास साहसी खेळ म्हणून मान्यता मिळवून दिल्यामुळे भारताचे नाव जागतिक पातळीवर जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून दहीहंडी या खेळाबाबतची नियमावली क्रीडा खाते तयार करणार आहे. दहीहंडीला साहसी खेळ म्हणून मान्यता दिल्यामुळे गोविंदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोणीही केवळ विरोधाला विरोध म्हणून या चांगल्या निर्णयाचा विरोध करू नये असे आवाहन करत पुढे म्हणाले, गोविंदांना आरक्षण दिलं आहे. सध्या जे खेळाडूंना आरक्षण आहे त्यामध्येच दहीहंडी या खेळाचा समावेश होणार आहे. या निर्णयाचा एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काहीही वेगळा परिणाम होणार नाही. पूर्वीच्या साहसी खेळामध्ये या खेळाचा समावेश होणार आहे. जखमी गोविंदांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळणार आहे. दहीहंडीला आज साहसी खेळ म्हणून मान्यता दिली की लगेच उद्या त्याची अंमलबजावणी होईल आणि सर्व गोविदांना नोकरी मिळेल, असा चुकीचा गैरसमज विरोधक पसरवत आहेत. क्रीडा क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती, संस्था या सर्वांशी विचार विनिमय करीत नियमावली तयार करण्यात येईल. या निर्णयाकडे खिलाडूवृत्तीने आणि सकारात्मक भावनेतून पाहणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

गेल्या अनेक वर्षांपासूनची दहीहंडी या हिंदूंच्या पारंपरिक सणाला साहसी खेळ म्हणून मान्यता देण्याची मागणी युती सरकारने मान्य करणे, ही निश्चितपणे आनंददायी बाब आहे. हा खेळ देशपातळीसह जागतिक पातळीवर जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘प्रो गोविंदा स्पर्धा’ पुढच्या वर्षीपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकारने घेतलेला आहे. मुंबईमध्ये जय जवान संघाने नऊ स्तराची दहीहंडी लावून एक वेगळा विश्वविक्रम केल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *