Breaking News

सत्यपाल मलिक यांनी मुलाखती दरम्यान पुलवामा, कलम ३७० हटविण्यासंदर्भात केले हे दावेः वाचा ३७० कलम पोलिसी बंडाच्या भीतीने रद्द केले

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सत्यपाल मलिक यांची द वायर या संकेतस्थळासाठी ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा सरकारवर गंभीर आरोप केले. त्यांच्या या आरोपांवरून सध्या देशभर राजकीय चर्चा सुरू झाली आहे. करण थापर यांनी ‘द वायर’साठी घेतलेल्या मुलाखतीमध्ये सत्यपाल मलिक यांनी विविध मुद्द्यांवर स्पष्ट आणि रोखठोक उत्तरं दिली. “पुलवामा हल्ला आमच्या चुकीमुळे झाल्याचं मोदींना सांगितलं तेव्हा त्यांनी गप्प राहायला सांगितलं”, असा दावा मलिक यांनी केला. त्याचबरोबर आता काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्याच्या प्रक्रियेबाबतही त्यांनी खळबळजनक दावे केले.

सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हटवण्यात आलं. त्यावेळी आपल्याशी केंद्र सरकारने, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किंवा तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कोणतीही चर्चा केली नव्हती, असं सत्यपाल मलिक म्हणाले. “हे मी शपथेवर सांगू शकतो. मला काहीच माहिती नव्हतं. ४ तारखेला रात्री मला गृहमंत्र्यांचा फोन आला की सत्यपाल मी एक चिठ्ठी पाठवतोय. सकाळी ११ वाजेच्या आधी तुमच्या कमिटीकडून मंजूर करून पाठवून द्या. माझ्या चिठ्ठी शिवाय कलम ३७० हटलंच नसतं, असं सत्यपाल मलिक यांनी सांगितले. पहिल्या दिवसापासूनच मला माहिती होतं की हे होणार आहे. मोदींचा पहिला अजेंडा कलम ३७० हटवणं हाच होता, असंही ते म्हणाले.

काश्मिरमधील पोलिसही कलम ३७० हटवल्यानंतर बंड करतील, अशी भीती केंद्र सरकारला होती, असा दावा सत्यपाल मलिक यांनी केला.
काश्मीरमधील जनतेला ३७० कलम हटवण्यापेक्षा राज्य केंद्रशासित प्रदेश केलं याचं जास्त वाईट वाटलं. यातही माझा सल्ला घेतला गेला नाही. सल्ला घेतला असता तर मी सांगितलं असतं की हे नका करू. राज्य केंद्रशासित प्रदेश केलं तर तिथले पोलिस थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली येतात. नाहीतर पोलीस राज्य सरकार किंवा राज्यपालांच्या नियंत्रणाखाली असतात, म्हणून हा निर्णय घेतला गेला असं मला वाटतं. तेव्हा अशी भीती होती की तिथले पोलिस बंड करू शकतात, असं सत्यपाल मलिक यांनी सांगितले.

पोलिसांच्या बंडाच्या भीतीपोटी त्यांनी केंद्र शासित प्रदेश घोषित केलं. हे मला मुख्य सचिवांनीही सांगितलं होतं. ते म्हणाले की १ हजार लोक मारावे लागतील. हे पोलिस ठाण्यात घुसतील, हत्यारं हिसकावून घेतील, पोलिस बंड करतील. मी त्यांना म्हटलं तुम्ही निश्चिंत राहा. मला विश्वास आहे की एक साधं कुत्रंही भुंकणार नाही. पण पोलीस बंड करू शकतात ही भीती निराधार होती, असाही दावा त्यांनी केला.

त्याचबरोबर पुलवामा येथे सशस्त्र सैन्य दलावर झालेला हल्ला हा आपल्या चुकीमुळे झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं. पण त्यांनी मला गप्प रहायला सांगितले. वास्तविक पाहता या दलाच्या शिफ्टींगसाठी एअर लिफ्ट करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तीन विमाने मागण्यात आली होती. पण त्यांनी ती दिली नाहीत. यासंदर्भात आपल्याकडे जरी ही विमाने मागितली असती तरी ती उपलब्ध करून दिली असती असा दावा सत्यपाल मलिक यांनी केला.

यासंदर्भात अजित डोवल यांनाही यासंदर्भात बोललो पण त्यांनीही तुम्ही शांत रहा असे सांगितल्याचा दावा त्यांनी केला.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *