Breaking News

बच्चू कडू यांचे खुले राणांना आव्हान, किती दम आहे ते माहित पडेल

मागील तीन-चार दिवसापासून आमदार रवी राणा आणि प्रहार संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू यांच्यात सामना सुरु आहे. आमदार कडू यांनी रवी राणा यांना दिलेली मुदत उद्या संपत आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता लागली असताना बच्चू कडू म्हणाले की, तो माझ्या एकट्यावर नसून, सत्ताधारी पक्षातील सर्वच आमदारांवर आहे. आम्ही पैसे घेतले तर ते दिले कोणी, या प्रश्नाचे उत्तरही आ. राणा यांनी दिले पाहिजे. मी पैसे घेतल्याचे पुरावे येत्या १ नोव्हेंबरपर्यंत राणांनी सादर केले नाही तर, आमच्या पद्धतीने आंदोलन करू. वेळप्रसंगी आमदारकीचा राजीनामा देऊन मैदानात उतरू, असा इशारा रवी राणा यांना दिला.

आ. कडू हे आज शनिवारी यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव, कळंब आणि राळेगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतात भेट देण्यासाठी आले असता बाभूळगाव येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. बाभूळगाव तालुक्यातील सरूळ, तांबा आदी गावात त्यांनी शेताच्या बांधावर भेट दिली. तसेच बाभूळगाव येथे प्रहारच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले.

यावेळी बोलताना आ. कडू यांनी खा. सुप्रिया सुळे यांनी राजकीय नेत्यांसाठी सुचविलेल्या आचारसंहितेच्या कल्पनेचे स्वागत केले. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन राजकीय व्यक्तींनी कसे बोलायचे, काय बोलायचे या संदर्भात आचारसंहिता ठरविणे अत्यंत गरजेचे आहे. अशा आरोप–प्रत्यारोपांमुळे वेळ, श्रम विनाकारण वाया जातात, असे कडू म्हणाले.

मंत्रीपदासाठी कडूंची सर्व धडपड सुरू असल्याबाबत विचारले असता, असे मंत्रीपद आवोळून टाकतो, असे ते म्हणाले. वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देऊन पूर्ण ताकदीने मैदानात उतरू, तेव्हाचा बच्चू कडू काही वेगळा असेल, असेही त्यांनी सांगितले. आ. राणांनी केलेल्या आरोपांचा निषेध म्हणून आम्ही १ नोव्हेंबरला आंदोलनास बसणार आहोत. ज्या ताकदीने त्यांनी आरोप केले, आता त्यांच्यात दम असेल तर पुरावे सादर करावे, असे आव्हान कडू यांनी दिले.

आम्ही ५० खोके घेतल्याचा आरोप करणारे आ. रवी राणा स्वत: मंत्रीपदाच्या रांगेत कशासाठी लागतात? आ. राणा यांनी थोडी तरी लाज, लज्जा ठेवायला पाहिजे. ज्या घरी जेवायला जायचे त्याच घरवाल्यांना ताट फेकून मारण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *