Breaking News

नाना पटोलेंचा खोचक सवाल, राज्याचे गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर जनता कशी सुरक्षित असेल? बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्रींच्या वसईतील कार्यक्रमाला परवानगी देऊ नका

राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे फडणवीस यांनीच सभागृहात सांगितले. या प्रकरणात एका मुलीला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण गंभीर आहे त्याची चौकशी करुन जे सत्य असेल ते उघड झाले पाहिजे. परंतु राज्याचा गृहमंत्रीच सुरक्षित नसेल तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नी अमृता यांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यांना एक कोटी रुपयाची लाच ऑफर केल्याचेही त्यांनी सांगितले. फडणवीस व त्या संबंधित परिवाराशी जुने संबंध असून फडणवीस मुख्यमंत्री असतानापासूनचे त्यांचे संबंध आहेत. सत्तेत असताना व सत्तेत नसतानाही फडणवीस यांच्या कुटुंबाचा व ज्यांच्यावर ब्लॅकमेल केलेल्या आरोप केला आहे त्या कुटुंबाचा संबंध होता असे खुद्द फडणवीसच सांगत आहेत. यामागे काही राजकीय नेते व पोलीस अधिकारीही असल्याचा त्यांचा आरोप आहे. आम्हाला एवढेच सांगायचे आहे की देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत, पोलीस यंत्रणा त्यांच्याकडे आहे,त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी व वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी.

धिरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका..

बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांचा वसई-विरार येथे १८ व १९ मार्च २०२३ रोजी एक कार्यक्रम होत असल्याची माहिती आहे. धिरेंद्र शास्त्री यांनी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा अपमान करणारे विधान करुन लाखो वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांच्या कार्यक्रमाला राज्य सरकारने परवानगी देऊ नये अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे, अंधश्रद्धेला आपल्या राज्यात अजिबात थारा नाही, महाराष्ट्राने तसा कायदाही केला आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या तसेच संत तुकाराम महाराज यांचा अपमान करणाऱ्या धिरेंद्र शास्त्री यांच्या वसई-विरार येथील कार्यक्रमाला परवानगी दिल्यास जनतेची दिशाभूल करून त्यांच्या भावनांशी, श्रद्धेशी खेळ मांडला जाऊ शकतो असेही पटोले म्हणाले.

Check Also

विजय वडेट्टीवार यांच्या आरोपाला उज्वल निकम यांचे प्रत्युत्तर, माझ्या पोतडीत….

कसाब किंवा आतंकवाद हा पाकिस्तानमधून पसरवलेला नाही, मुंबई हल्ल्यात पाकिस्तानने नाही, कसाबने निष्पाप लोकांचे बळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *