Breaking News

कोरोनाची भीती बाळगून फार काळ घरात बसता येणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी
कारखाने, व्यापार आणि उद्योग गेले ४० दिवस बंद आहेत. रोजगार बुडाला आहे. त्याचा विपरीत परिणाम शासनाच्या अर्थकारणावर होत आहे. राज्याचा २०-२१ चा अर्थसंकल्प पाहिला तर महसुली उत्पन्न हे ३ लाख ४७ हजार कोटीच्या आसपास जाईल असं दिसतंय. परंतु आज सुधारित माहिती घेतली असता या महसुलात तूट १ लाख ४० हजार कोटी रूपयांची येईल. याचा अर्थ एकंदर येणाऱ्या उत्पन्नापैकी ४० टक्के उत्पन्न महसुलाचा परिणाम राज्याच्या सगळ्या विकासाच्या विविध कामावर झाल्याशिवाय राहणार नाही. यासंदर्भात जरी सविस्तर प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेला असला तरी आता फार काळ कोरोनाला घाबरून घरात बसता येणार नसल्याचे इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला. म्हणून राज्यावरील आर्थिक संकट लक्षात घेऊन पंतप्रधानांना या प्रश्नांची कल्पना यावी म्हणून सविस्तर प्रस्ताव दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
समाजमाध्यमातून राज्यातील जनतेशी बोलताना त्यांनी वरील इशारा दिला.
देशात आणि राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. पाश्चिमात्य देशातही या आकड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. वाढणारे आकडे चिंताजनक असले तरी आता आपल्याला फार काळ घरात बसता येणार नाही. रोजगार बुडाल्याने अनेकांवर बेरोजगारीचे संकट आले आहे. राज्याच्या तिजोरीचा तळही लागेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल होणाऱ्या भागात आर्थिक गाडा रूळावर आणण्याचा प्रयत्न करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लातूर भूकंप असेल किंवा मुंबई बॉम्बस्फोट असेल या पूर्व इतिहासाचे स्मरण करून जे संकट आले आहे त्यावर धैर्याने मात करून कामाला लागूया असे सांगत पोलिस आणि डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केले. आपल्यासाठी जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या या लोकांना सहकार्य करुया अशी विनंती त्यांनी जनतेला केली.
सध्या ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. मुंबई व पुणे याबाबतीत वेगळा निर्णय होईल परंतु काही ठिकाणांचा लॉकडाऊन उठवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पूर्वीसारखी गर्दी करु नका. सरकारच्या सूचनांचे कटाक्षाने पालन करा असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान केंद्र व राज्य एकत्र बसून या सगळ्या प्रश्नांवर मार्ग काढण्याची निती ठरवावी. त्यासाठी त्रास होईल पण आव्हान आहे. त्यामुळे एकजुटीने यावर मात करु असे सांगतानाच राज्यांना वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक मदत करता येईल म्हणून हा प्रस्ताव दिला. केंद्र सरकारने राज्यांना अधिक शक्ती दिली पाहिजे. सध्या राज्य फिल्डवर काम करत आहे. लोकांच्या यातना कमी करण्यासाठीच्या कामात गुंतले आहे. सगळी यंत्रणा कामाला लागली आहे तर केंद्राची यंत्रणा ही रिसोर्स कसे निर्माण करता येईल, याकडे त्यांनी लक्ष द्यावे अशी मागणीही त्यांनी केली.
सध्या संस्था व संघटना मदत करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलच्यावतीने पक्षीय विचार न करता रुग्णसेवा दिली जात आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स आणि त्यांच्या स्टाफला कोरोना विषाणूची बाधा होवू नये म्हणून सुरक्षा आवरणे देत हातभार लावला जात आहे. याशिवाय राज्यात जे लोककलावंत आहेत त्यांना आर्थिक मदत राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून केली जात आहे त्याची अंमलबजावणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
वेगवेगळ्या राज्यात देवदर्शन व पर्यटनासाठी गेलेले नागरीक अडकून पडले आहेत त्यांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी राज्यसरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी मुंबईत आपत्ती व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. तिथे अभय यावलकर काम करत आहेत. अजूनही कुणाला काही अडचण असेल त्यांनी ०२२-२२०२७९९०,०२२-२२०२३०३९,याशिवाय ९८२११०७५६५, ८००७९०२१४५ इथे संपर्क साधावा त्यांच्याकडून सहकार्य मिळेल असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील साखर कारखाने, सूत गिरण्या, सहकारी बँका, सहकारी पतसंस्था यांनी आपल्या नफ्यातील रक्कम बाजुला करून गरीब जनतेला अन्न धान्य द्यावे. त्यामध्ये गहू, तांदूळ, डाळी दिल्या तर उपयोगी ठरतील असे आवाहनही त्यांनी केले.
शेतकर्‍यांना शेतीसाठीचे जे कर्ज दिले जाते त्याची पुनर्रचना केली पाहिजे. अल्पमुदतीचे कर्ज मध्य व दिर्घ मुदतीचे करावे. कर्जफेडीचे हप्ते लांबवले पाहिजे. व्याजदरात सवलत दिली पाहिजे. पीककर्जाचा व्याजाचा दर शून्यावर आणावा आणि तसा दर परत करण्याचा कालावधी ३० जून २०२० च्यापुढे ढकलावा. असेच निर्णय उद्योग, व्यापारासंबंधी आर्थिक क्षेत्रात घेण्याची गरज आहे. शेती, उद्योग, व्यापार या सगळ्या क्षेत्रात आज त्यांचं अर्थकारण सावरण्यासाठी रिझर्व्हं बॅंकेकडून पावले टाकली जात आहेत. त्यात आणखी वाढ केली पाहिजे असे सांगत त्यांनी मार्गदर्शन करण्याऐवजी आदेश द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी त्यांनी १ मे महाराष्ट्र दिना निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देत चित्रुट अभिनेता इरफान खान, ऋषी कपूर यांना आदरांजली वाहीली.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *