Breaking News

विजयी झाल्यानंतर सत्यजीत तांबे म्हणाले, त्या कारणांमुळे मी अपक्ष म्हणून उभा राहिलो भाजपाकडे काँग्रेसनेच ढकलले

संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला. निकालानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे स्पष्ट केले निवडणुकीपूर्वी काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर सत्यजीत तांबे ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. या निवडणुकीनंतर ते काँग्रेस पाठिंबा देणार की भाजपाला याबाबत चर्चा रंगली होती. दरम्यान, सत्यजीत तांबेंनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.

सत्यजीत तांबे म्हणाले की, मागील महिनाभराच्या काळात आमच्या कुटुंबावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. आमचं कुटुंब सुरुवातीपासून काँग्रेस पक्षात आहे. २०३० मध्ये आमच्या कुटुंबाला काँग्रेस पक्षात येऊन १०० वर्षे होतील. आम्ही पक्षासाठी निष्ठेनं काम केलं. विविध आव्हानात्मक परिस्थितीत आम्ही काम केलं. युवक काँग्रेससाठी काम करताना माझ्यावर ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले. यामुळे मला पासपोर्टही मिळत नव्हता. मी चळवळीतून पुढे आलेला कार्यकर्ता आहे. आता आमदार म्हणून निवडून आल्यानंतर काँग्रेसला पाठिंबा देणार की भाजपाला? असे विचारलं असता, मी अपक्ष निवडणूक लढलो आणि यापुढेही मी अपक्षच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी पुढे बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले, महाराष्ट्र काँग्रेसवर गंभीर आरोप करताना म्हणाले, बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी आणि आमच्या कुटुंबाला काँग्रेस बाहेर ढकलण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले होतं. तसेच महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीतील एकाही जागेचा उमेदवार दिल्लीतून जाहीर झाला नाही. अमरावती, नागपूरमधील उमेदवारांचं नाव दिल्लीतून जाहीर झालं का? मग एकच उमेदवारी दिल्लीतून जाहीर का झाली? हे सर्व एका षडयंत्राचा भाग आहे असा गंभीर आरोपही प्रदेश काँग्रेसचे नाव न घेता केला.
सत्यजीत तांबे म्हणाले, मी एक दोन पत्रकार परिषदेत ऐकलं की नाशिक पदवीधर मतदारसंघातून कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय तांबे कुटुंबाला घ्यायचा होता. मग बरोबर १२.३० वाजता दिल्लीतून माझ्या वडिलांची उमेदवारी का जाहीर झाली? माझे वडील सांगत आहेत की, मला उभं राहायचं नाही, माझ्या मुलाला उभं करायचं आहे, तर मग माझ्या वडिलांची उमेदवारी साडेबारा वाजता का जाहीर करण्यात आली असा सवालही केला.

सत्यजीत तांबे पुढे म्हणाले, मी माझ्या पहिल्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे म्हटलं होतं की, मी काँग्रेसचा उमेदवार आहे. हे माझं पहिलं वाक्य होतं. माझ्या वडिलांनी तर आम्ही महाविकास आघाडीचे आहोत, असाही शब्दही वापरला होता. तसेच अपक्ष असल्याने सर्वच पक्षांनी माझ्या पाठिशी उभं राहावं, अशी भूमिका मी घेतली.

मी सगळ्याच पक्षांकडे पाठिंबा मागायला जाणार आहे आणि त्यात भाजपाचंही नाव घेतलं. परंतू, मी भाजपाचा पाठिंबा घेणार अशी बातमी चालवण्यात आली. पक्षांतर्गत ही स्क्रिप्ट आधीच तयार झाली होती. त्याला बळ देण्याचं काम काही लोकांनी केलं. मला भाजपात ढकलण्याचंच काम झालं. हे अर्धसत्य मागील २५ दिवसांपासून सुरू होतं. त्यामुळे हे खरंखरं सांगण्यासाठी मी पुढे आलो, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

तांबे पुढे म्हणाले की, युवक काँग्रेसचं पद गेल्यानंतर संबंधित व्यक्तीला कुठेतरी संधी देण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून केलं जातं. त्याला विधान परिषदेवर घेतात. यासाठी ज्यावेळी मी माझ्या पक्षश्रेष्ठींकडे जायचो, तेव्हा तुमच्या घरात तुमचे वडील आमदार आहेत. त्यामुळे तुम्हाला विधान परिषद देता येणार नाही, असं सांगितलं जायचं. वास्तविक माझ्या वडिलांनी अत्यंत कष्टाने नाशिक मतदारसंघ वाढवला आहे. २००९ पासून माझ्या वडिलांनी अत्यंत कष्टाने हा मतदारसंघ उभा केला आहे.

मी आमचे पक्षश्रेष्ठी एच के पाटील यांना भेटून मला संधी द्या, असं सांगितलं. मी संघटनेत एखादं पद किंवा जबाबदारी मागितली होती. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. तुम्ही तुमच्या वडिलांच्या जागेवर विधान परिषदेची निवडून लढा, असं मला सांगण्यात आलं, असं जेव्हा एच के पाटील बोलले तेव्हा मला प्रचंड संताप आला. मी त्यांना सांगितलं की, माझ्या वडिलांच्या जागेवर जर मला निवडणूक लढवायची असती, तर मी २२ वर्षे संघटनेसाठी काम का केलं? मी हा विचार वाढवण्याचं काम केलं. मला पक्षाने किंवा संघटनेनं काहीतरी द्यावं, अशी माझी मानसिकता आहे. वडिलांच्या जागी निवडणूक लढवावी, अशी माझी मानसिकता नाही. हे मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं. पण दुसरी कुठली संधी तुला देणं शक्य नाही, तू वडिलांच्या जागी प्रयत्न कर, असा सल्ला ते मला देऊ लागले. याला माझा पूर्णपणे विरोध होता, अशी प्रतिक्रिया सत्यजित तांबेंनी दिली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *