Breaking News

राज्यातील जागा वाटप आणि परिस्थितीचा काँग्रेस आढावा घेणार गुरूवारी गांधी भवन येथे होणार बैठक

मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत असलेली परिस्थिती आणि संभावित विजयी जागांचा आढावा घेण्यासाठी गुरूवारी सकाळपासून प्रदेश काँग्रेस कार्यकारणीची बैठक होणार आहे. ही बैठक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली.
ऐन लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून जाहीर केलेली उमेदवारी माघारी घेतली. तर दुसऱ्याबाजूला पक्षाचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे-पाटील यांनी काँग्रेसमधून थेट भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकिय परिस्थितीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला फटका बसणार का याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अहमदनगर आणि औरंगाबाद या दोन जागांबाबत अद्याप एकमत झालेले नाही. त्यामुळे या दोन्ही जागांबाबत काँग्रेसने काय भूमिका घ्यावी याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या उमेदवार मिळत नाही. तसेच औरंगाबादची जागा जरी काँग्रेसच्या ताब्यात असली तरी तेथे मागील तीन वेळा काँग्रेसला विजय मिळविता आला नाही. याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
हे दोन मतदारसंघ वगळता राज्यातील इतर जागांबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी संभावित उमेदवारी कोणाला द्यायची याविषयी बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. एकमत झालेल्या जागांसाठी अनेक इच्छुक उमेदवार आहेत. मात्र विजयाची खात्री देणाऱ्या उमेदवाराचा तिकिट द्यायचे की नवख्या चेहऱ्यांना संधी द्यायची यावरही चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांची टीका, उबाठा रंग बदलणारा सरडा

युतीमध्ये असताना उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गात होते. आता मोदी यांच्या नावाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *