Breaking News

मुख्यमंत्री महोदय, चर्चेसाठी तारीख आणि वेळ ठरवा मुख्यमंत्र्यांचे आव्हान काँग्रेस प्रचार समितीप्रमुख नाना पटोलेंनी स्वीकारले

मुंबई : प्रतिनिधी
मागील पाच वर्षात माझ्या सरकारने दुप्पट काम केले आहे. त्यावर कुठल्याही व्यासपीठावर चर्चा आणि वाद- विवाद करायला तयार असल्याचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विरोधकांना दिलेले आव्हान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी स्विकारले आहे. तसेच या चर्चेसाठी आणि वाद-विवादासाठी मुख्यमंत्र्यांनी तारीख व वेळ ठरवावी असे प्रति आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचा प्रमुख या नात्याने मी स्वीकारत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मुंबईतील प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पावन भूमी गुरूकुंज मोझरी येथून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली महाजनादेश यात्रा सुरू केली. या यात्रेदरम्यान जाहीर सभांतून ते माझ्या सरकारने दुप्पट काम केल्याचे सांगत सुटले आहेत. मात्र, सोने अथवा एखादी गोष्ट दामदुप्पट करून देतो असे सांगून फसवणारे आपण पाहिले असून फडणवीस जनतेसोबत आता हेच करत असल्याचा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
फडणवीस यांचे सरकार जनतेला ‘फसणवीस सरकार’ म्हणूनच माहित आहे. पण आता फसवणूक करण्याची ही सुधारित आवृत्ती असल्याचा खोचक आरोपही त्यांनी यावेळी केला.
फडणवीस सरकारने मागील पाच वर्षात फक्त चमकोगिरी करण्याचे काम केले. सिंचन, शेती, शहर विकास, दुष्काळ, बेरोजगारी निर्मुलन, आदिवासी, मध्यमवर्गीय, अल्पसंख्याक आदींसाठी काम केले असते तर पंचतारांकित रथात ‘महाजनादेश’ यात्रेची नौंटकी करण्याची गरज भासली नसती. मुख्यमंत्री सरकारी म्हणजेच जनतेच्या कर रूपाने मिळालेल्या पैशांवर यात्रेची मौजमजा लुटत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
गेल्या वर्षी ३५ हजारांहून अधिक गावांत दुष्काळ जाहीर करावा लागला. तरीही मुख्यमंत्री आम्ही महाराष्ट्र दुष्काळमुक्त केला असे छाती बडवून सांगत आहेत. राळेगणसिद्धीसारखी आम्ही राज्यात २१०० गावे तयार केली अशी खोटी माहिती सादर करत आहेत. या २१०० गावांची नावे जाहीर करावे असे आव्हानही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
राज्यातील काही उद्योग, कार्यालये गुजरातला गेली आहेत. दमणगंगा पिंजाळ प्रकल्पाच्या पाण्यावर गुजरातचा हक्क नसतानाही त्यांना राज्याच्या खर्चातून पाणी देऊ पाहणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे सेवक आहेत की गुजरातचे दलाल असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.
‘फडणवीस दामदुप्पट पर्दाफाश महामेळावे’ घेणार
मुख्यमंत्र्यांनी माझे आव्हान न स्वीकारल्यास फडणवीस ज्या ज्या ठिकाणी ‘महाजनादेश’ यात्रेच्या निमित्ताने जात आहेत, सभा घेत आहेत तेथे मी काँग्रेसच्या वतीने जाऊन ‘ फडणवीस दामदुप्पट पर्दाफाश महामेळावे’ घेईन. तसेच मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा पुराव्यानिशी जनतेसमोर मांडून ‘फसणवीस सरकार’चा पर्दाफाश करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *