Breaking News

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघातील प्रचार थंडावला

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकांचे बिगूल वाजून जवळपास एक महिन्याचा कालावधी लोटला. संपूर्ण देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणूका पार पाडण्यात येत आहेत. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर या पाच लोकसभा मतदारसंघासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात आहे. यासाठी मतदान १९ एप्रिल रोजी होत आहे. तत्पूर्वी आज या पाच लोकसभा मतदारसंघातील प्रचारतोफा थंडावल्या आहेत.

लोकसभा निवडणूकीसाठी या पाचही लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून नागपूरमध्ये विकास ठाकरे, रामटेकमधून श्यामकुमार बर्वे, भंडारा गोंदियातून डॉ प्रशांत पडोळे, चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर, गडचिरोली-चिमूर मधून नामदेव किरसन यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर भाजपाकडून नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, रामटेकमधून राजू पारवे, भंडारा-गोंदियातून सुनिल मेंढे तर गडचिरोली-चिमूरमधून अशोक नेते यांना भाजपाने उमेदवारी जाहिर केली आहे.

या पाचही लोकसभा मतदारसंघात भाजपा, काँग्रेसप्रमाणे वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार उभे केले आहेत. विशेष म्हणजे या पाचही मतदारसंघातील आपापल्या उमेदवारांना निवडूण आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी यांच्यासह राज्यस्तरीय नेत्यांच्या सभा पार पडल्या. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याही या पाच मतदारसघात सभा झाल्या. जाहिरसभांबरोबरच या पाच मतदारसंघात उमेदवारांनी मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रचार रॅली, रोड शो, प्रसारमाध्यमातून बातम्यांच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न केला.

नेमक्या याच कालावधीत एप्रिल महिन्याचा मध्य आल्याने वातावरणातील तडाखाही चांगलाच राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेलाही बसायला लागला. त्यामुळे अनेक भागात राष्ट्रीयस्तरावरील नेत्याची सभा असतानाही वाढत्या गर्मीमुळे सभेला जाण्याऐवजी घरात बसून टीव्ही पाहणे पसंत केले. मात्र यंदा सर्वाधिक प्रचाराच्या माध्यमातून भाजपानेच आघाडी घेतल्याचे दिसून येत होते. तर दुसऱ्याबाजूला प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची प्रचारात आघाडी नसल्याचे दिसून येत होते.

मतदारांमध्येही भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवारांपेक्षा नरेंद्र मोदी यांची मागील १० वर्षातील राजवट तर मागील चार वर्षातील राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा यासह महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरच आपापसात चर्चा मतदारांमध्ये घडताना दिसून येत होते. हे सगळे मुद्देही भाजपा, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी प्रचारसभांमधून मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. परंतु राष्ट्रीय स्तरावरील मुद्दे आणि स्थानिकपातळीवर भेडसावणारे प्रश्न यामुळे मतदारांमध्ये एकप्रकारची सुप्त लाट निर्माण झाल्याचे जाणवत होते. यापार्श्वभूमीवर या पाचही लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची मुदत आत संध्याकाळी पाच वाजता संपुष्टात आल्याने या भागातील प्रचार थंडावला आहे. आता या पाचही मतदारसंघातील जनता कुणाच्या पारड्यात आपले मत टाकणार हे येत्या १९ एप्रिल रोजी कळेल. मात्र त्याचा निकाल ४ जून रोजीच सर्वांना समजणार आहे.

 

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *