Breaking News

अखेर सोमय्यांनी रश्मी ठाकरे यांचे “ते” हस्तलिखित पत्र केले जाहीर रश्मी ठाकरेंनी त्या घरांचा उल्लेख बंगले असा केल्याचा सोमय्यांचा दावा

मराठी ई-बातम्या टीम

कोर्लाई गावात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांच्या नावे १९ बंगले असल्याचा आरोप भाजपाचे माजी आमदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यास प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सोमय्या यांना ते बंगले दाखवच असे प्रति आव्हान दिले. त्यानंतर सोमय्या यांच्या विरोधात रोज एक नव्या आरोपांची मालिका राऊत यांनी सुरु केल्यानंतर आज सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांनी कोर्लाई गावच्या सरपंचाला लिहिलेले पत्रच ट्विट करत संजय राऊत यांना चांगलेच कोंडीत पकडले.

कोर्लाई गावातील त्या कथित १९ बंगल्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले असताना काल कोर्लाई गावचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी सोमय्या यांचे आरोप खोटे असल्याचे सांगत सदरची जागा अन्वय नाईक यानी एका ख्रिश्चन समुदायाकडून विकत घेतली होती. त्यानंतर त्यांनी तेथे रिसॉर्ट तयार करण्याची योजना आखली होती. मात्र त्यास परवानगी मिळाली नसल्याने नाईक यांनी ती जागा विकली. ती जागा रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी खरेदी केली. त्यावेळी तेथे साधी घरे होती. कालांतराने ती घरे पाडल्यानंतर त्याबाबतची माहिती रश्मी ठाकरे यांनी ग्रामपंचायतीला कळविली. त्याची शहानिशा करून त्यावर आकारण्यात येणारा कर ग्रामपंचायतीने रद्द केल्याचा खुलासा केला.

त्यावर आज किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी ग्रामपंचायतीला लिहिलेले ते पत्रच ट्विट करत त्या पत्रामध्ये सदर जागेतील बंगले/घरे नावे करण्याची विनंती पत्र ग्रामपंचायतीला लिहील्याचे हस्तलिखित पत्रच जाहीर केले.

दरम्यान सोमय्या यांनी प्रसिध्द केलेल्या त्या पत्रातील पहिल्या पानावर जागेची खरेदी केल्याबाबतचा उल्लेख आहे तर दुसऱ्या पानावरील मजकूरात त्या जागेवर उभ्या असलेल्या नेमक्या गोष्टीचा उल्लेख स्पष्टपणे वाचता येत नाही त्यामुळे त्यात घरे की बंगले असा थोडासा वाचताना गोंधळ होत आहे.

आता किरीट सोमय्या यांनी थेट रश्मी ठाकरे यांचे ते हस्तलिखित पत्रच जाहीर केल्यामुळे आगामी काळात संजय राऊत विरूध्द किरीट सोमय्या असा सामना चांगलाच रंगणार असल्याची शक्यता दिसून येत आहे.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *