Breaking News

मतांच्या जोगव्यासाठी यात्रा काढण्याऐवजी दुष्काळी दौरा करा मुख्यमंत्री फडणवीस यांना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा उपरोधिक सल्ला

मुंबई : प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. राज्याच्या बहुतांश भागात खरीपाची पेरणीही झाली नाही. अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्तांना मदत करण्याऐवजी सत्ताधारी भाजप शिवसेनेचे नेते मतांचा जोगवा मागण्यासाठी राज्यव्यापी यात्रा काढून शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. या नेत्यांनी प्रचार यात्रा काढण्याऐवजी दुष्काळी भागाचा दौरा करावा असा उपरोधिक सल्ला देत म्हणजे त्यांना जमिनीवरचे जळजळीत वास्तव दिसेल, अशी घणाघाती टीका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
राज्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती आहे. भाजप शिवसेना सरकारच्या काळात १५ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जुलै महिना संपत आला तरी राज्याच्या बहुतांश भागात अद्याप पेरणी झाली नाही. जिथे थोडीफार पेरणी झाली होती. तिथली पिके वाळू लागल्याने दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. हा दुष्काळाचा तेरावा महिना आहे. दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून सरकारची अवस्था नियंत्रण सुटलेल्या जहाजासारखी झाल्याची टीका त्यांनी केली.
पाऊस लवकर पाडावा अशी अपेक्षा करण्यापलिकडे सरकार काहीही करत नाही. त्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. यंदाचा खरीप हंगाम शेतक-यांच्या हातून गेल्यातच जमा आहे. निसर्गाची अवकृपा व सरकारची अनास्था अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. त्याला मदत करण्याऐवजी सत्ताधारी पक्ष यात्रा आणि इव्हेंटबाजी करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *