Breaking News

रात्रीस खेळ रंगला अन सकाळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिसले राष्ट्रपती राजवट संपुष्टात येत देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचा शपथविधी

मुंबईः विशेष प्रतिनिधी
शुक्रवारी रात्रीपर्यंत शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यात सत्ता स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यानंतर रात्री उशीराने वेगळाच रंगत भल्या पहाटे ५.४५ वाजता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचा शपथविधी झाल्याचे चित्र अवघ्या महाराष्ट्राला पाह्यला मिळाले.
शिकाँराच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असल्याने राज्यातील राष्ट्रपती राजवट लवकरच संपणार अशी अटकळ सर्वच राजकिय नेत्यांसह जनतेने बांधली होती. परंतु मध्यरात्रीच सत्तेच्या सारीपटाची चक्रे भाजपाने वेगाने फिरवली. त्यासाठी रात्री साधारणतः १ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केंद्र सरकारच्या शिफारसीनुसार राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवित असल्याचे नोटीफिकेशन काढले. त्यानंतर भल्या पहाटे भाजपाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभवनावर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा अजित पवार यांच्या मदतीने दावा केला. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांची यादी राज्यपालाना सादर करण्यात आल्याचे राज्यपाल भवनावरील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
यावेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे १० ते १२ आमदार राजभवनावर शपथविधीच्या सोहळ्यास उपस्थित असल्याचेही स्पष्ट झाले. विशेष म्हणजे या शपथविधी सोहळ्याची गुप्तता देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच अजित पवार यांनी चांगलीच बाळगल्याचे उघडकीस आले आहे.
या शपथविधी सोहळ्यासंदर्भात भाजपातील अनेक माजी मंत्र्यांना, ज्येष्ठ नेत्यांना याबाबत विचारणा केली असता याची कोणतीच माहिती भाजपाच्या नेत्यांना नसल्याचे अनेक माजी मंत्र्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांना तर याची गंधवार्ताच नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांचा ग्रह असा झाला की या सत्ता स्थापनेमागे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तर नाहीत ना अशी शंका घेण्यास सुरुवात केली. मात्र शरद पवार यांनीच याबाबत ट्विट करत याबाबत कोणतीच माहिती नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बिथरलेले नेते शांत झाले.

Check Also

इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाने घेतली लोकसभा निवडणूकीच्या कामकाजाची माहिती

इंडोनेशिया देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *