Breaking News

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय आता ६५ वर्षे दोन लाख कर्मचाऱ्यांना लाभ होणार

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अंगणवाडी केंद्रात काम करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. सुमारे दोन लाख कर्मचारी अंगणवाडी सेवेत कार्यरत आहेत.
अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसंदर्भात त्यांच्या संघटनेसोबत झालेल्या चर्चेवेळी सेविकांच्या सेवा समाप्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत विचारविनिमय झाला होता. त्यानुसार अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांचे सेवा समाप्तीचे वय 60 वर्षे करणे, मानधनात वाढ करणे याबाबतचा शासन निर्णय 23 फेब्रुवारी 2018 रोजी काढण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या सेवा समाप्तीचे वय 65 वर्षे ठेवण्याबाबत विधानमंडळाच्या मार्च-2018 च्या अधिवेशनात सदस्यांनी मागणी केली होती. त्यानुसार काही अटींच्या अधीन राहून कार्यरत असलेल्या सेविकांचे सेवा समाप्तीचे वय 65 वर्षे ठेवण्याबाबत विचार करण्यात येईल, असे आश्वासन सभागृहास देण्यात आले होते. त्यानुसार आजचा निर्णय घेण्यात आला.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांवर केंद्र शासनाने सोपविलेल्या जबाबदाऱ्या पाहता त्या शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे 60 वर्षानंतर कोणत्याही व्यक्तीस सक्षमपणे काम करण्यास वैद्यकीय कारणास्तव अडचणी येतात. त्यामुळे वयाची 60 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असते. त्यामुळे 1 डिसेंबर 2018 रोजी वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या अंगणवाडी सेविका-मदतनीसांची वैद्यकीय तपासणी करुन त्या काम करण्यास पात्र असल्याबाबतचे सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्यांना मानधनी सेवेत ठेवण्यात येणार आहे. शासनाने विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार 60 वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर आणि 63 वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर असे दोन वेळा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार प्रथमत: तीन वर्षे म्हणजे वयाची 63 वर्षे पूर्ण होईपर्यंत आणि त्यानंतर पुढील दोन वर्षे म्हणजे वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत काम करता येणार आहे. आदिवासी व ग्रामीण प्रकल्पांसाठी जिल्ह्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक यांचे तसेच नागरी भागासाठी शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक किंवा वैद्यकीय मंडळ यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल. सेविका-मदतनीस यांची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी संबंधित शासकीय वैद्यकीय यंत्रणांना कळविल्यानंतर त्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी करुन त्यांना विहित नमुन्यात मोफत प्रमाणपत्र देण्यात येईल.
नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या (1 नोव्हेंबर 2018 पासून) अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाड्यांच्या एकत्रिकरणानंतर मदतनीसाची अंगणवाडी सेविका म्हणून नेमणूक केल्यास त्यांची मानधनी सेवा 60 वर्षे राहणार आहे. अंगणवाडी केंद्राच्या कामकाजासह माहिती संकलनाचे कामकाज डिजिटल होत असून अंगणवाडीबाबतच्या नोंदी Common Application Software मध्ये भरावयाच्या असल्याने अंगणवाडी सेविकांना तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी वेळोवेळी प्रावीण्य परीक्षा आयोजित करण्यासही मान्यता देण्यात आली.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *