Breaking News

२६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर संविधान सप्ताह सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान संविधान सप्ताह साजरा करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
संविधान सप्ताह आयोजित करण्याबाबतची आढावा बैठक आज मंत्रालयात झाली त्यावेळी बडोले बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक अजय अंबेकर, अतिरिक्त समाज कल्याण आयुक्त भीमराव खंडाते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूरचे मुख्य समन्वयक डॉ. सिद्धार्थ गायकवाड व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर पर्यंत संविधान सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. तसेच या सप्ताहाचा मुख्य कार्यक्रम मुंबई व नागपूर येथे होणार आहे. या सप्ताहामध्ये राज्यातील अनुसूचित जातीतील दारिद्र्य रेषेखालील भूमीहिनांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजने अंतर्गत जमिनी वाटप सुरु करण्यात येणार आहे. विविध महामंडळांच्या लाभार्थ्यांना कर्ज वाटप व विभागामार्फत इतर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या संविधान सप्ताहमध्ये राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊन संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन करतील. या सप्ताहमध्ये संविधानावर आधारित निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य, प्रश्न मंजुषा, चर्चासत्र आदी कार्यक्रम राबविले जातील. या संविधान सप्ताहनिमित्त प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा समाज कल्याण कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे व विशेष प्रसिद्धी मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *