Breaking News

रश्मी शुक्लांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले… चुकीच्या पध्दतीने फोन टॅपिंग प्रकरण

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होणाऱ्या गोष्टींचा तपास करण्यासाठी फोन टॅपिंगची परवानगी घेत सत्ताधाऱ्यांचेच फोन टॅप करण्याचा प्रताप करणाऱ्या आयपीएस अधिकारी रश्मी शुल्का यांच्यावर आज पुणे येथील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, विधानसभेत झालेल्या चर्चेनुसार आणि आश्वासित केल्याप्रमाणे उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात आली. त्यानुसार रश्मी शुक्ला यांनी चुकिच्या पध्दतीने फोन टॅपिंग केल्याचे उघड झाले.

या संदर्भात राज्य सरकारने राज्यातील पोलीस महासंचालकांना आणि आयुक्तांना योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रश्मी शुक्ला दोषी आढळून आल्यामुळे त्यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे तसेच इतर लोकांचे फोन टॅप करण्यात आले होते. ज्यांचे फोन टॅप करण्यात आले होते त्यांचा संबंध ड्रग्ज अथवा तत्सम अमली व्यवसायाशी असल्याचे कारण पुढे करण्यात आले होते असेही त्या म्हणाल्या.

रश्मी शुक्ला या सध्या सेंट्रल डेप्युटेशनवर कार्यरत असल्याने त्यांच्या संदर्भात नेमकी काय कारवाई करण्यात येईल याची कायदेशीर माहिती घेऊन कारवाई करू असे सांगत असा सूडभावनेचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही, असे सांगत या प्रश्नाचे खंडन केले.

मागील विधानसभा अधिवेशनात यावर चर्चा उपस्थित झाल्यामुळे चौकशी करण्यात आली. चौकशी अहवाल समोर आल्यानंतरही त्याची सखोल चौकशी केल्यानंतरच कारवाई करण्यात आली. कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा सरकारी अधिकाऱ्याने आपल्या जबाबदारीचे भान न ठेवता चुकीच्या पद्धतीने कृती केली, तरी त्या व्यक्तीला शासनाच्या नियमाप्रमाणे शिक्षा केली जाते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

देशात कोणत्याही व्यक्तीचा फोन टॅप करायचा असेल तर भारतीय तार अधिनियम १९८५ कायद्यान्वये सार्वजनिक सुरक्षा राखण्यासाठी, आंतरिक सुरक्षेसाठी, दहशतवादी कृतींना प्रतिबंध करण्यासाठी, संवेदनशील दखलपात्र गुन्हे प्रतिबंधित करण्यासाठी तसेच परदेशी मित्रराष्ट्रांचे हितसंबंध राखण्यासाठी अनुमती आहे. परंतु यापैकी कोणतेही कारण नसताना रश्मी शुक्ला यांनी ज्या फोन टॅपिंगसाठी परवानगी घेतली त्यामध्ये व्यक्तींची नावे बदलून दुसऱ्या नावांची परवानगी घेण्यात आली. ज्यामध्ये नाना पटोले – अमजद खान, बच्चू कडू – निजामुद्दीन बाबू शेख, संजय काकडे – तरबेज सुतार, आशिष देशमुख – रघु चोरगे अशाप्रकारची नावे देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या व्यक्ती कॉलेज विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विकतात असा रिपोर्ट त्यांनी केला होता. त्याआधारे ही टॅपिंगची परवानगी मिळवली असल्याचे ते म्हणाले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *