Breaking News

दिशा सालियानच्या कुटुंबियांच्या आवाहनानंतरही चंद्रकांत पाटील यांचे भाकित मृत्यूचे सत्य सात मार्चनंतर बाहेर येईल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेवून केलेल्या आरोपानंतर व्यथित झालेल्या दिशा सालियनच्या कुटुंबियानी आम्हाला शांतपणे जगू द्या, मुलगी गेल्याचे दु:ख काय असते ते तुम्हाला नाही कळणार, या सततच्या आरोपामुळे आम्हालाही काही करून घ्यायची इच्छा होत असून जर आमच्या जीवाला काही झाले तर त्यास जबाबदार हेच लोक राहतील असा इशारा आज दुपारी दिल्यानंतरही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिशा सालियानच्या मृत्यूबाबत नेमके काय झाले हे सत्य सात मार्चनंतर बाहेर येईल. यामध्ये कोण गुंतले आहे आणि कोण तुरुंगात जाणार हे स्पष्ट होईल असे भाकित करत सालियन कुटुंबियांच्या जखमेवर आणखी मीठ चोळण्याचा प्रकार केल्याचे दिसून येत आहे.

दिशा सालियानच्या मृत्यूचे राजकारण होत असल्याचा आरोप एका पत्रकाराने निदर्शनाला आणला असता ते म्हणाले की, याबाबतीत काहीही राजकारण होत नाही. सात मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील, दूध का दूध – पानी का पानी होईल, कोण गुंतले आहे आणि कोणाला तुरुंगात जावे लागेल हे स्पष्ट होईल. सध्या त्यामुळेच उसने अवसान आणून शिवराळ भाषा वापरणे चालू आहे. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो तसा हा प्रकार आहे.

महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. काही जात्यात गेले तर काही सुपात आहेत. कोठड्या तयार आहेत. उत्तर प्रदेशात सात मार्च रोजी शेवटचे मतदान झाले की, बहुधा कारवाई सुरू होईल. त्यातून पळता भुई थोडी होईल व त्यातून हे सरकार पडेल, असे भाकितही त्यांनी यावेळी करत असा अंदाज सामान्य माणूसही बांधू शकतो असे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे. ऊसाच्या एफआरपीचे पैसे दोन तुकड्यात देण्याचा या सरकारचा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करणारा आहे. यामुळे शेतकरी ऊसशेती सोडून देतील असा धोका आहे. भारतीय जनता पार्टी या निर्णयाविरोधात टोकाचा संघर्ष करेल असा इशाराही त्यांनी दिला.

महाविकास आघाडी सरकारने राजकारणासाठी सत्तेचा व पोलिसांचा दुरुपयोग चालविला आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांना पकडून पोलीस ठाण्यात नेणे आणि दबाव आणण्याचा प्रकार चालू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची १९७१ ची जमिनीची केस काढून पोलिसांनी त्यांचा प्रचंड छळ केला. अखेरीस त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. पोलिसांचा राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांप्रमाणे वापर करण्याचा हा प्रकार आम्ही सहन करणार नाही. आम्ही याच्याविरोधात लढा देऊ. जनताही अशा लोकांना धडा शिकवेल असे ते म्हणाले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना नेते व मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, २०१४ साली भारतीय जनता पार्टीने सरकार स्थापन केले. आम्ही हे सरकार आमच्या बळावर पाच वर्षे चालविले असते. पण शिवसेनेला सत्तेबाहेर राहणे अशक्य झाले काहीही करून सत्तेत घ्यावे यासाठी ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत होते, हे आदित्य ठाकरे यांनी विसरू नये असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

एसटीच्या संपाविषयी ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांना विविध शहरांमध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेल्या एसटीच्या स्थानक व डेपोच्या जागा बळकावायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी संप चिघळवला आहे. सत्ताधारी आघाडीच्या सापळ्यात एसटी कर्मचारी अडकले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *